सार

Pune Rain News : पुण्यात नदीपात्रात स्टॉल्स काढण्यासाठी गेलेल्या तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेजण एका अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते.

Pune Rain News : पुणे शहरात हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टचा परिणाम दिसून आला असून बुधवारी रात्रीपासून शहरात पाण्याचे तांडव सुरु आहे. पावसाच्या या हाहाकारामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील सिंहगड रोडसह नदीकाठच्या भागांमध्ये लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. पुणे शहराप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये पावसाचा जोर अजूनही कायम असून अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. पिंपरी चिंचवडमधील लाल टोपी नगरमध्ये पहाटेपासूनच नागरिकांच्या घरात पाणी शिरलेले असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. त्यांनी प्रशासनला सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. हवामान विभागाने मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सांगली, हिंगोली, परभणी, लातूरसह कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात येत्या तीन ते चार तासांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

 

 

पुण्यात नदीपात्रात 3 जणांचा मृत्यू

नदीपात्रात स्टॉल्स काढण्यासाठी गेलेल्या तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेजण एका अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. पुणे महानगर पालिकेच्या समोर असलेल्या टिळक पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. ज्या भागात पाणी झाले त्या ठिकाणी बोटीही बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले आहे. पुणे शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. पार्किंगमध्ये गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत.

 

 

मदतकार्यासाठी ८ बोटी आणि बचाव पथके

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मावळमधील कुंडदेवी मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे. मावळ तालुक्यात बुधवारपासून तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पुणे महानगरपालिकेने ८ बोटी आणि बचाव पथके मदतकार्यासाठी नियुक्त केल्या आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना खाद्य पदार्थ व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना केल्या आहेत.

आणखी वाचा : 

Pune Rain News : 'पुण्यात महत्त्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नका' : अजित पवार