Pune Pay And Park Scheme : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महानगरपालिकेने सहा प्रमुख रस्त्यांवर 'पे अँड पार्क' योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेअंतर्गत दुचाकींसाठी प्रति तास केवळ ४ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंग या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील सहा अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजना राबवण्याचा पालिकेचा प्रस्ताव असून, या माध्यमातून शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, निविदा प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने सध्या या योजनेला मुदतवाढ दिली आहे.
या 6 रस्त्यांवर लागू होणार ‘पे अँड पार्क’
महानगरपालिकेच्या योजनेनुसार पुढील प्रमुख रस्त्यांवर पार्किंगसाठी शुल्क आकारले जाणार आहे.
लक्ष्मी रोड
जंगली महाराज (JM) रस्ता
फर्ग्युसन कॉलेज (FC) रस्ता
बालेवाडी हायस्ट्रीट
विमाननगर रस्ता
बिबवेवाडी मुख्य रस्ता
फक्त 4 रुपयांत दुचाकी पार्किंग
पालिकेच्या प्रस्तावात दुचाकी वाहनांसाठी प्रति तास केवळ 4 रुपये इतके नाममात्र शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या सहा रस्त्यांवर एकूण 6,344 दुचाकी आणि 618 चारचाकी वाहनांची पार्किंग क्षमता उपलब्ध होणार आहे. या योजनेतून पुणे महानगरपालिकेला दरवर्षी सुमारे 12 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
व्यापारी, कर्मचारी आणि ग्राहकांसाठी दिलासा
लक्ष्मी रोडसारख्या बाजारपेठांमध्ये अनेक व्यापारी आणि कर्मचारी सकाळपासूनच वाहने उभी करतात. परिणामी, खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना पार्किंगची जागा मिळत नाही. त्यातच रस्त्यांवर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी अधिक तीव्र होते. सध्या महापालिकेच्या वाहनतळांवर तासाला 20 रुपये शुल्क आकारले जाते. त्या तुलनेत रस्त्यावरील हे पार्किंग सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिक परवडणारे ठरणार आहे.
सात वर्षांनंतर धोरणाची अंमलबजावणी
२०१८ मध्ये मंजूर झालेल्या पार्किंग धोरणाला तब्बल सात वर्षांनंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होत आहे. सध्या महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने, ती संपल्यानंतर या ‘पे अँड पार्क’ योजनेबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.


