- Home
- Maharashtra
- SSC Hall Ticket Update : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! २ दिवसांत हॉल तिकीट होणार ऑनलाईन उपलब्ध
SSC Hall Ticket Update : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! २ दिवसांत हॉल तिकीट होणार ऑनलाईन उपलब्ध
SSC Hall Ticket Update : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठीची हॉल तिकीटे २० जानेवारीपासून ऑनलाइन उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठीची हॉल तिकीटे येत्या मंगळवारपासून (२० जानेवारी) ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शाळांसाठी महत्त्वाच्या सूचना
राज्यातील सर्व माध्यमिक शाळांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून www.mahahsscboard.in लॉगिन करून विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे डाउनलोड करता येणार आहेत. शाळांनी ही हॉल तिकीटे प्रिंट करून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का व स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना वितरित करायची आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, हॉल तिकीट देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश मंडळाने दिले आहेत.
हॉल तिकीटातील चुका कशा दुरुस्त कराल?
विद्यार्थ्याच्या नावात, विषयात किंवा इतर तपशीलात काही त्रुटी आढळल्यास त्या शाळांना ऑनलाइन पद्धतीने दुरुस्त करता येतील. मात्र, फोटो किंवा स्वाक्षरी बदलायची असल्यास, संबंधित शाळांनी विभागीय मंडळ कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
दहावी परीक्षा कधी सुरू होणार?
दहावीची मुख्य परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. परीक्षा जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत शाळेतून आपले हॉल तिकीट घ्यावे आणि त्यावरील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले आहे.

