पर्वती परिसरात आजोबाने नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. शेजाऱ्यांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मुलीची सुटका झाली. आरोपीविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Pune Crime :  पुण्यातील पर्वती परिसरात एक संतापजनक घटना उघडकीस आली असून 70 वर्षीय आजोबाने स्वतःच्या 9 वर्षांच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

शेजाऱ्यांच्या सतर्कतेने वाचली चिमुकली

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने नातवाला पैसे देऊन बाहेर पाठवले आणि नातीसोबत एकटं राहून अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र मुलीच्या आरडाओरडामुळे शेजाऱ्यांचे लक्ष गेले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने हा प्रकार उघडकीस आला आणि चिमुकलीची सुटका करण्यात यश आले.

पोलिसांची तत्काळ कारवाई

घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संतप्त नागरिकांचे आंदोलन

या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. संतप्त नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी समजूत घालून परिस्थिती नियंत्रणात आणली.

राजकीय प्रतिक्रिया; कठोर कायद्याची मागणी

या घटनेवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया देत राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी सरकारने तातडीने कठोर कायदे लागू करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.