- Home
- Maharashtra
- Pune MHADA Lottery : पुणे म्हाडा लॉटरीचा मुहूर्त ठरला! ४,१८६ घरांच्या सोडतीसाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' दिवशी निघणार लकी ड्रॉ!
Pune MHADA Lottery : पुणे म्हाडा लॉटरीचा मुहूर्त ठरला! ४,१८६ घरांच्या सोडतीसाठी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' दिवशी निघणार लकी ड्रॉ!
Pune MHADA Lottery : आचारसंहितेमुळे रखडलेली पुणे म्हाडाची ४,१८६ घरांची सोडत आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हाडा सभापतींनी निवडणूक आयोगाची भेट घेतल्याने या प्रक्रियेला गती मिळाली असून, परवानगीनंतर एका आठवड्यात 'लकी ड्रॉ' काढला जाईल.

पुणे म्हाडा लॉटरीची प्रतीक्षा संपणार! ४,१८६ घरांचा 'लकी ड्रॉ' लवकरच
पुणे : स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आचारसंहितेच्या कचाट्यात अडकलेली पुणे म्हाडाची (MHADA Pune) सोडत आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याने या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
नेमकं काय घडलं?
पुणे मंडळाच्या ४,१८६ घरांसाठीची प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापासून प्रलंबित आहे. अर्जांची छाननी पूर्ण झाली असली तरी आचारसंहितेमुळे 'लकी ड्रॉ' रखडला होता. ही कोंडी फोडण्यासाठी आढळराव पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया असून यात कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जाणार नाही, हे त्यांनी आयोगाला पटवून दिले.
निवडणूक आयोगाचे सकारात्मक संकेत
या भेटीनंतर निवडणूक आयोगाने सकारात्मक भूमिका घेतली असून, येत्या २ ते ३ दिवसांत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मुख्य सचिव आणि गृहनिर्माण विभागाशी चर्चा करून या प्रक्रियेला हिरवा कंदिल मिळण्याची दाट शक्यता आहे. परवानगी मिळताच अवघ्या एका आठवड्यात घरांची लॉटरी काढली जाईल.
अर्जदारांची आर्थिक ओढाताण, व्याजाचा भुर्दंड थांबणार?
सप्टेंबरपासून हजारो अर्जदारांची अनामत रक्कम (EMD) म्हाडाकडे जमा आहे. अनेकांनी ही रक्कम कर्ज काढून किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भरली आहे. निकाल रखडल्यामुळे या सर्वसामान्यांना व्याजाचा मोठा फटका सोसावा लागत आहे. सोशल मीडियावरही "एक तर निकाल लावा किंवा आमच्या पैशांवर व्याज द्या," अशी मागणी जोर धरत होती. आता लवकरच निकाल लागल्यास अर्जदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
सोडतीची स्थिती एका दृष्टिक्षेपात
एकूण घरे: ४,१८६
पात्र अर्जदार: २,१३,९८५
अपात्र अर्ज: १,९८० (कागदपत्रांतील त्रुटींमुळे)
निकाल: निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर ७ दिवसांच्या आत.
पुणेकरांचे घराचे स्वप्न आता केवळ एका परवानगीच्या अंतरावर असून, लवकरच हजारो कुटुंबांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

