- Home
- Maharashtra
- Pune Metro Update : आयटीयन्ससाठी मोठी खुशखबर! हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो प्रत्यक्ष धावण्याच्या आणखी जवळ, आज महत्त्वाची चाचणी यशस्वी
Pune Metro Update : आयटीयन्ससाठी मोठी खुशखबर! हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो प्रत्यक्ष धावण्याच्या आणखी जवळ, आज महत्त्वाची चाचणी यशस्वी
Pune Metro Update : हिंजवडी आयटी पार्कला शिवाजीनगरशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन ३ ची तांत्रिक चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. माण डेपो ते पुणे विद्यापीठ चौक या मार्गावर झालेल्या या यशस्वी ट्रायल रनमुळे प्रवासी सेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.

आयटीयन्ससाठी मोठी खुशखबर!
पुणे : पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांसाठी आणि रोजच्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हिंजवडी आयटी पार्कला शिवाजीनगरशी जोडणाऱ्या ‘पुणे मेट्रो लाईन ३’ या बहुप्रतिक्षित प्रकल्पाने आज एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. ८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता माण डेपो ते पुणे विद्यापीठ चौक या मार्गावर मेट्रोची तांत्रिक चाचणी कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण झाली.
यापूर्वी झालेल्या चाचणीदरम्यान काही तांत्रिक त्रुटी आढळल्या होत्या. मात्र आरडीएसओ (Research Designs and Standards Organisation) यांच्या सहकार्याने हे दोष तातडीने दूर करण्यात आले. आजचा यशस्वी ट्रायल रन म्हणजे या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल मानले जात आहे.
सुरक्षितता ते हाय-स्पीडपर्यंत सखोल चाचणी
या चाचणीदरम्यान मेट्रोच्या
सुरक्षितता प्रणाली
वीजपुरवठा व्यवस्था
आपत्कालीन ब्रेकिंग सिस्टीम
ट्रॅक जिओमेट्री
उच्च वेगातील स्थिरता
या सर्व बाबींची बारकाईने तपासणी करण्यात आली. टाटा समूह आणि पीएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेली ही २३.३ किलोमीटर लांबीची उन्नत मेट्रो मार्गिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
१० मेट्रो रेक दाखल, आणखी २२ लवकरच
या प्रकल्पासाठी आतापर्यंत १० हून अधिक मेट्रो रेक पुण्यात दाखल झाले असून, उर्वरित २२ रेक लवकरच सेवेत दाखल होणार आहेत. विशेषतः गणेशखिंड रस्ता आणि पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सहन करणाऱ्या नागरिकांसाठी ही मेट्रो सेवा मोठा दिलासा ठरणार आहे.
३१ मार्चपर्यंत बहुतेक स्थानके खुली करण्याचे लक्ष्य
पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानकांच्या इमारती, प्लॅटफॉर्म तसेच प्रवाशांच्या सोयी-सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत बहुतांश स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मेट्रोमुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला मिळणार नवी दिशा
हिंजवडीतील हजारो आयटी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता अंतिम टप्प्यात येत असून, या मेट्रोमुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा आणि वेग मिळणार आहे. विविध यंत्रणांच्या समन्वयामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे.

