- Home
- Utility News
- रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! सोलापूर-पुणे मार्गावर मेगाब्लॉक; इंटरसिटी, हुतात्मासह 'या' गाड्या रद्द, पाहा संपूर्ण वेळापत्रक
रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! सोलापूर-पुणे मार्गावर मेगाब्लॉक; इंटरसिटी, हुतात्मासह 'या' गाड्या रद्द, पाहा संपूर्ण वेळापत्रक
मध्य रेल्वेने दौंड-काष्टी स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी ४ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कामामुळे सोलापूर-पुणे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! सोलापूर-पुणे मार्गावर मेगाब्लॉक
सोलापूर : जर तुम्ही येत्या काही दिवसांत रेल्वेने प्रवासाचा बेत आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेच्या दौंड - काष्टी स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी मोठा 'ब्लॉक' घेण्यात येणार आहे. या कामामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
का घेतला जातोय ब्लॉक?
दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील दौंड ते काष्टी दरम्यान दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ४ जानेवारी ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत विशेष ब्लॉक घोषित केला आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
दुहेरीकरणामुळे खालील गाड्या ठराविक तारखांना धावणार नाहीत.
सोलापूर - दौंड डेमू (०१४६१/०१४६२): ४ जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंत रद्द.
पुणे - सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस (१२१६९/१२१७०): १५ जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंत रद्द.
पुणे - सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस (१२१५७/१२१५८): २४ व २५ जानेवारी रोजी रद्द.
पुणे - हरंगुळ स्पेशल (०१४८७/०१४८८): २४ व २५ जानेवारी रोजी रद्द.
हडपसर - सोलापूर डेमू (११४२१/११४२२): २४ व २५ जानेवारी रोजी रद्द.
पनवेल - नांदेड एक्सप्रेस (१४६१३/१७६१४): २४ व २५ जानेवारी रोजी रद्द.
कलबुर्गी - दौंड स्पेशल (०१४२२/०१४२५): २४ व २५ जानेवारी रोजी रद्द.
निजामाबाद - पंढरपूर एक्सप्रेस (११४१३/११४१४): २४ व २५ जानेवारी रोजी रद्द.
'या' गाड्यांच्या मार्गात बदल (Diverted Trains)
काही गाड्या दौंड-मनमाड मार्गाऐवजी दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
१. तिरुवनंतपुरम - मुंबई एक्सप्रेस (१६३३२): २४ जानेवारीपासून कुर्डूवाडी - मिरज - पुणे मार्गे धावेल.
२. बंगळुरू - मुंबई उद्यान एक्सप्रेस (११३०२): २४ जानेवारीपासून कुर्डूवाडी - मिरज - पुणे मार्गे धावेल.
३. हुबळी - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (२०६५७): २३ जानेवारीपासून सोलापूर - कुर्डूवाडी - लातूर - परळी - परभणी - छत्रपती संभाजीनगर - मनमाड मार्गे धावेल.
वेळेत बदल (Rescheduled Trains)
कर्नाटक एक्सप्रेस (१२६२८): २३ जानेवारी रोजी नवी दिल्लीहून सुटणारी ही गाडी १ तास ४० मिनिटे उशिराने धावणार आहे.
प्रवाशांना आवाहन
प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत ॲपवर किंवा चौकशी खिडकीवर गाडीची सद्यस्थिती तपासूनच घरून निघावे, जेणेकरून तुमची गैरसोय टाळता येईल.

