भारतीय रेल्वे पुणे आणि नवी दिल्ली दरम्यान नवीन वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस सुरू करणार आहे. ही पूर्णतः वातानुकूलित ट्रेन फर्स्ट एसी, एसी 2-टियर आणि एसी 3-टियर कोचसह सुसज्ज असेल आणि अंदाजे २० तासांत प्रवास पूर्ण करेल.

पुणे – भारतीय रेल्वेने पुणे आणि नवी दिल्ली दरम्यान नवीन वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही ट्रेन धावणार असून, प्रवाशांना या मार्गावर जलद, सुरक्षित आणि आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा प्रवास अनुभवता येणार आहे.

या ट्रेनमध्ये स्लीपर कोच असून ती पूर्णतः वातानुकूलित असेल. यामध्ये फर्स्ट एसी, एसी 2-टियर आणि एसी 3-टियर अशा प्रकारचे कोच असतील. प्रवासासाठी लागणारा वेळ साधारण 20 तासांचा असून ही ट्रेन 160 किमी प्रतितास वेगाने धावू शकते. थांब्यांमध्ये समावेश: नवीन वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस दिल्ली-पुणे मार्गावर मथुरा, आग्रा, ग्वाल्हेर, भोपाळ, खंडवा आणि भुसावळ येथे थांबेल. या मार्गामुळे मध्य भारतातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

भाडे रचना:

  • एसी 3-टियर: अंदाजे ₹2,500
  • एसी 2-टियर: अंदाजे ₹4,000
  • फर्स्ट क्लास एसी: अंदाजे ₹5,000

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून त्यासाठी आवश्यक चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. रेल्वेच्या या नव्या पावलामुळे पुणे-दिल्ली प्रवासाचा अनुभव अधिक दर्जेदार होणार असून रेल्वे प्रवास पुन्हा एकदा ‘प्रथम पसंती’ ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.