सार

ट्रॅफिक सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनचालकांकडून पैशांची मागणी करत असताना बळजबरी करणाऱ्या तृतीयपंथींवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे, असे सुतोवाच पुणे पोलिसांनी केले आहे.

पुणे : ट्रॅफिक सिग्नलवर किंवा घरगुती समारंभात तृतीयपंथी पैसे मागितले जातात हे काही नवीन नाही. मात्र अनेकदा तृतीयपंथी पैसे देण्यास जबरदस्ती करतात किंवा मारहाण करतात. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तृतीयपंथी वाद घालतात. ट्रॅफिक सिग्नलवर वाद घातल्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. असे अनेक प्रकार शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. अशातच पुणे पोलिसांनी याच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर फौजदारी संहिता प्रक्रियेच्या कलम १४४ नुसार कारवाई केली जाणार असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

तृतीयपंथीयांचा मनमानी कारभाराविरोधात कारवाईचा बडगा :

ट्रॅफिक सिग्नल आणि सार्वजनिक व घरगुती समारंभात आमंत्रणाशिवाय घुसखोरी करून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जाहीर केले आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ नुसार जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि दंडाधिकारी अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांना सार्वजनिक उपद्रव रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय राबविण्याचे आदेश देता येतात.

तृतीयपंथींविरोधात तक्रारींमध्ये वाढ :

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, तृतीयपंथींच्या छळवणुकीबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याप्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय हाती घेण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी काढलेल्या पत्रकात म्हटले की, आमच्या निदर्शनास आल्यानुसार काही लोकांचे गट आणि विशेषतः तृतीयपंथी लग्न, इतर धार्मिक समारंभ, कुटुंबातील जन्म, मृत्यू यांसारख्या प्रसंगी एकट्याने किंवा एकत्रितपणे लोकांच्या घरी जमतात आणि जबरदस्तीने पैशांची मागमी करतात. पैसे न दिल्यास अश्लील आणि धमकावणारे वर्तन करतात. लोक स्वेच्छेने देत असल्यापेक्षा जास्त पैसे मागितले जातात, असे निदर्शनास आले आहे. बेकायदेशीरपणे एकत्र येणे, खंडणी वसूल करणे, सार्वजनिक उपद्रव निर्माण करणे इत्यादी गुन्ह्यांसह आयपीसीच्या विविध कलमांखाली दंडनीय गुन्हा असले तरी अशा घटकांच्या भीतीमुळे अनेक लोक तक्रार करण्यासाठी पुढे येऊ शकत नाहीत. म्हणून अशा प्रकारच्या उपद्रवी आणि जनतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांना रोखण्याच्या दृष्टीकोनातून सदर आदेश देण्यात येत आहे.

आणखी वाचा :

पुणे येथे बनावट शेअर ट्रेडिंग रॅकेटचा पोलिसांकडून भांडाफोड, पाच जणांना अटक

पुणे विद्यापीठात लव्ह जिहादच्या आरोपाखाली विद्यार्थ्याला बेदम मारहाण, अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल

धक्कादायक! पैश्यांसाठी मैत्रिणीचे अपहरण केले, खून करून जाळून पुरले