Bhima Koregaon Traffic Diversions : भीमा-कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीत 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान मोठे बदल केले. चाकण, शिक्रापूर, आळंदी या प्रमुख मार्गांवर अवजड व खाजगी वाहनांना प्रवेशबंदी जाहीर केले आहे.
पुणे : भीमा-कोरेगाव येथील पेरणे फाटा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 जानेवारी रोजी ऐतिहासिक विजयस्तंभावर शौर्य दिन व अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी पुणे जिल्ह्यात दाखल होत असल्याने, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील वाहतुकीत तात्पुरते पण महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
हे वाहतूक बदल 31 डिसेंबर सकाळी 10 वाजल्यापासून 1 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार असून, चाकण, शिक्रापूर, आळंदी, तळेगाव आणि MIDC परिसरातील अनेक प्रमुख मार्गांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतचे अधिकृत आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केले आहेत.
खाजगी व अवजड वाहनांना प्रवेशबंदी
चाकण ते शिक्रापूर या मार्गावर दोन्ही बाजूंनी सर्व खाजगी वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावर केवळ अनुयायांच्या बसेसना परवानगी देण्यात येणार आहे. मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने आणि मालवाहतूक ट्रक आता तळेगाव–चाकण मार्गाऐवजी वडगाव मावळ, म्हाळुंगे, खेड व नारायणगाव मार्गे वळवण्यात येणार आहेत. तसेच आळंदी फाटा, मोशी चौक आणि पांजरपोळ परिसरातून जाणाऱ्या अवजड वाहनांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
अनुयायांसाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन
कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष वाहतूक मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
नाशिककडून येणाऱ्या बसेस चाकण मार्गे शिक्रापूर येथे पोहोचतील
मुंबईकडून जुन्या महामार्गाने येणाऱ्या बसेस वडगाव फाटा–म्हाळुंगे–चाकण मार्गे नेण्यात येतील
हलकी वाहने आळंदी–मरकळ–तुळापूर मार्गे लोणीकंद येथील पार्किंगकडे वळवली जातील
दरम्यान, मरकळ येथील इंद्रायणी नदीवरील पुलावर 8 फूट उंचीची मर्यादा असल्याने, त्यापेक्षा उंच वाहनांना या मार्गावरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
MIDC परिसरात या कालावधीत जड वाहनांना अनुयायांसाठी निश्चित केलेल्या मार्गांवर प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे लोणीकंदकडे जाणाऱ्या खाजगी वाहनधारकांनी अलंकापुरम (तापकीर चौक) किंवा चऱ्होली फाटा हे पर्यायी मार्ग वापरावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुणे शहरातून विश्रांतवाडी मार्गे आळंदीकडे जाणाऱ्या वाहनांनाही मज्जाव करण्यात आला असून, त्यांना वाघोली मार्गे लोणीकंद येथे वळवण्यात येईल.
रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर अत्यावश्यक सेवा वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत राखण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे व पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.


