- Home
- Maharashtra
- पुणे म्हाडा लॉटरीला आचारसंहितेचा मोठा फटका! २ लाख पुणेकरांचे घराचे स्वप्न लांबणीवर; आता 'या' तारखेलाच निघणार सोडत
पुणे म्हाडा लॉटरीला आचारसंहितेचा मोठा फटका! २ लाख पुणेकरांचे घराचे स्वप्न लांबणीवर; आता 'या' तारखेलाच निघणार सोडत
Pune MHADA Lottery : पुणे म्हाडाची सव्वाचार हजार घरांची सोडत निवडणूक आचारसंहितेमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे २ लाखांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा वाढली असून, ही सोडत आता फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे.

पुणे म्हाडा लॉटरीला आचारसंहितेचा 'ब्रेक'!
पुणे : आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो पुणेकरांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. पुणे म्हाडाच्या (MHADA) सव्वाचार हजार घरांची बहुप्रतिक्षित सोडत आता आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली असून, ही प्रक्रिया अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
नेमकं कारण काय?
पुणे, पिंपरी-चिंचवडसह सांगली आणि सोलापूरमधील ४,१६८ घरांसाठी म्हाडाने अर्ज मागवले होते. या घरांसाठी तब्बल २ लाख १५ हजार ८४७ अर्जांचा पाऊस पडला. सुरुवातीला ११ डिसेंबरला होणारी ही सोडत अर्जांच्या पडताळणीमुळे १६-१७ डिसेंबरपर्यंत पुढे गेली. मात्र, दरम्यानच्या काळात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.
आता सोडत कधी होणार?
म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ही सोडत फेब्रुवारी महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विशेष परवानगी घेण्याचे प्रयत्न केले होते, परंतु प्रशासकीय स्तरावर हिरवा कंदील न मिळाल्याने घरांचा 'ड्रॉ' रखडला आहे. ३१ जानेवारीपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकांचे सावट असल्याने ही प्रतीक्षा आणखी काही दिवस कायम राहणार आहे.
४४७ कोटी अडकले; व्याजाचे काय?
या सोडतीसाठी म्हाडाच्या तिजोरीत अर्जदारांची सुमारे ४४६ कोटी ९७ लाख रुपये अनामत रक्कम जमा झाली आहे. प्रक्रिया लांबणीवर पडल्याने या रकमेवर मोठे व्याज जमा होत आहे. "आमचे पैसे म्हाडाकडे अडकले आहेत, मग त्यावरील व्याजाचा फायदा आम्हाला का मिळत नाही?" असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य अर्जदारांकडून विचारला जात आहे. फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता शिथिल झाल्यानंतरच आता पुणेकरांच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

