शहरातील स्पा सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालवल्या जात असल्याचे उघड झाले आहे. 'धनराज', 'प्रिया' आणि 'अनुज' या त्रिकुटावर मकोका अंतर्गत कारवाईचे निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. 

पुणे: शहरातील स्पा सेंटरच्या आडून मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालवत असलेल्या 'धनराज', 'प्रिया' आणि 'अनुज' या त्रिकुटावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. या तिघांवर मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवणाऱ्या संबंधित पोलिस उपायुक्त आणि वरिष्ठ निरीक्षकाला थेट बक्षीस देण्याची घोषणा देखील पोलिस आयुक्तांनी केली आहे, त्यामुळे या प्रकारच्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस यंत्रणा अधिक सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पोलीस यंत्रणा गुन्हेगारांपर्यंत पोहचण्यात अपयशी 

'धनराज, प्रिया आणि अनुज' हे त्रिकुट सध्या शहरातील वेश्या व्यवसायाच्या केंद्रस्थानी असून, पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांनी शंभरहून अधिक स्पा सेंटर उघडले असून, या स्पा सेंटरच्या आडून मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. मात्र, पोलिस यंत्रणा अद्याप या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरली आहे. आतापर्यंत केवळ व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात आली असून, खऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

अवघ्या १५ वर्षांची मुलगी वेश्याव्यवसायात सापडली 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात अलीकडेच उघडकीस आलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणात 'धनराज, प्रिया आणि अनुज' या त्रिकुटाने केवळ नावापुरते स्पा सेंटर चालवले असून, प्रत्यक्षातील सर्व कारभार त्यांनी ‘व्यवस्थापकां’च्या माध्यमातून हाताळला आहे. हे व्यवस्थापक अनेकदा इतर ठिकाणांहून आणलेले असतात आणि पोलिसांच्या कारवाईत अडकतात, तर खरी सूत्रधार मंडळी मात्र मोकाट फिरतात. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गुन्हे शाखेच्या कारवाईत अवघ्या 15 वर्षांची मुलगी वेश्याव्यवसायात अडकलेली आढळून आली.

अनेक स्पा जोरात सुरु 

सध्या शहरात वेश्याव्यवसायविरोधात केवळ फुटकळ आणि निवडक कारवाया होत असून, मुख्य गुन्हेगार अजूनही मोकाट आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांच्या नावांवर थेट गुन्हे दाखल झालेलेही नाहीत. यामुळे पोलिसांची कारवाई प्रभावहीन असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांकडून करण्यात येत आहे. गेल्या वर्षी पोलिस आयुक्तांनी सामाजिक सुरक्षा विभाग बरखास्त करून वेश्याव्यवसायविरोधातील कारवायांसाठी खास ‘मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग’ सुरू केला होता. मात्र, अपेक्षित परिणाम न झाल्याने आणि ठोस पावले न उचलल्याने अनेक स्पा पुन्हा जोरात सुरू झाले असल्याचे समोर आले आहे.