Maharashtra Monsoon Update : पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने राज्यात पावसाच्या सरी कधी बसरणार याचा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय एल निनोमुळे यंदा पावसावर काय परिणाम होणार याबद्दलही हवामान खात्याने माहिती दिली आहे. 

Maharashtra Monsoon Update : राज्यात पावसाच्या सरी कधी बरसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दोन आठवड्यांपासून रखडलेल्या नैऋत मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पुन्हा गती मिळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, याशिवाय येत्या 25 जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. यानंतर 1 जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते. पण कोकण किनारपट्टी वगळता अन्य ठिकाणी यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

18 जूनपर्यंतची स्थिती

हवामान खात्यानुसार, देशात 18 जूनपर्यंत सरासरीपेक्षा 38 टक्के कमी पाऊस झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील स्थिती अधिक गंभीर असून राज्यात सरासरीच्या तुलनेत 78 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील फक्त तीन राज्यांमध्ये 40-50 टक्के पाऊस झाला आहे. उर्वरित 26 जिल्ह्यांत 60-90 टक्के पावसाची कमतरता आहे.

एल निनोमुळे परिणाम

प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती सक्रिय झाली आहे. यामुळे मान्सूनमध्ये एल निनोची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. याचा फटका संपूर्ण देशासह राज्याला बसण्याची दाट शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

24 जूनपर्यंत पावसाचा जोर कमीच राहणार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ जूनपर्यंत मॉन्सूनचा वेग मंदावलेला राहण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण भारतातील काही भाग आणि ईशान्येकडील राज्ये वगळता देशातील इतर भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते. महाराष्ट्रातही कोकणातील काही भागांत अधूनमधून जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसासाठी अजून वाट पाहावी लागू शकते.

25 जूननंतर राज्यभर पावसाला जोर?

25 जून ते 1 जुलै या कालावधीत मॉन्सून सक्रिय होऊन संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याचा अंदाज आहे. यादरम्यान, कोकण किनारपट्टीसह गोवा, कर्नाटक, केरळसह तामिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. राज्यातही कोकण विभागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इतर भागांमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस राहू शकतो.