Nishikant Dubey On Raj Thackeray Uddhav Thackeray : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, असे म्हणत त्यांनी मराठी नेत्यांना आव्हान दिले आहे.
मुंबई : भाजपचे आक्रमक खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. “महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय”, अशा थेट शब्दांत त्यांनी मराठी नेत्यांना आव्हान दिलं असून, "तुम्हाला आपटून आपटून मारू" अशा रोषपूर्ण शब्दांत त्यांचा समाचार घेतला आहे.
"तुम्ही कोणाच्या भाकरी खाताय?", दुबेंचा मराठी नेत्यानां थेट सवाल
दुबे म्हणाले, "तुम्ही मराठी बोलायला लावता? पण कोणाच्या भाकरी खाताय? टाटा, बिर्ला, रिलायन्स सर्व उद्योग आमच्याकडून आले आहेत. खाणी झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेशकडे आहेत. तुमच्याकडे काय आहे? उद्योग कुठे आहेत?" अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी ठाकरेंवर केली.
"हिंदी भाषिकांना मारता? मग उर्दूंना का नाही?"
दुबे यांनी स्पष्ट शब्दांत ठाकरेंना आव्हान दिलं. "तुमचं धाडस असेल, तर माहीममध्ये जा. दर्ग्याबाहेर उर्दू भाषिकांना मारून दाखवा. मग आम्ही मान्य करू की, तुम्ही खरे बाळासाहेबांचे वारसदार आहात."
"तुम्ही जर बॉस असाल, तर चला बिहारला, यूपीला, मग कळेल!"
"तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्र सोडून बाहेर निघा. उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडूत जा. तिथे काय ताकद आहे ते दाखवा. महाराष्ट्रात बसून आमचं शोषण करताय", अशा शब्दांत दुबे यांनी मराठी नेतृत्वावर हल्ला चढवला.
"मराठी संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे"
तणावाच्या या वक्तव्यातही दुबे यांनी स्पष्ट केलं की, "आम्हाला मराठी भाषेचा, संस्कृतीचा आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, टिळक, गोखले, तात्या टोपे या सर्वांचा आम्ही सन्मान करतो."
"BMC निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंचं ‘नीच’ राजकारण"
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू जे करत आहेत, ते "नीच पातळीचं राजकारण" असल्याचं दुबे म्हणाले. "जर त्यांनी हिंमत दाखवली आणि उर्दूंना मारलं, तरच आम्ही मानू की ते बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत", असंही त्यांनी स्पष्ट केलं.
निशिकांत दुबे यांचे हे वादग्रस्त विधान मराठी विरुद्ध हिंदी या वादाला नव्याने पेटवणारे ठरले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता ठाकरे बंधू यावर काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.


