Nashik Onion Express : नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी 'कांदा एक्सप्रेस' ट्रेन अडवली. सडका कांदा भरला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. दुसरीकडे, कांद्याचे वाढते भाव पाहता दिल्ली सरकारने NAFED कडून कांदा खरेदी करून तो स्वस्त दरात विकण्याची योजना आखली आहे.

नाशिक : नाशिकच्या लासलगाव स्टेशनवर शेतकऱ्यांनी बुधवारी दिल्लीला जाणारी 'कांदा एक्सप्रेस' रोखली. त्यांच्याकडून चांगला कांदा घेतला, पण ट्रेनमध्ये सडका कांदा भरला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

नाशिकमध्ये सडक्या कांद्यावरून शेतकऱ्यांचा संताप

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील किरकोळ महागाई जुलैमध्ये वाढून ४.४५ टक्क्यांवर पोहोचली आहे. जूनमध्ये ती ४.३८ टक्के होती. विशेषतः कांदा, आलं आणि लसूण यांसारख्या वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे ही महागाई वाढली आहे.

वाढत्या किमती रोखण्यासाठी दिल्ली सरकारची धावपळ

मंगळवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कांदा आणि साखरेच्या उपलब्धतेवर आणि किमतींवर एक बैठक झाली. सध्या राजधानीत कांदा किंवा साखरेची कोणतीही टंचाई नाही, असं या बैठकीत स्पष्ट झालं. पण, जर किमती आणखी वाढल्या, तर त्याचा अतिरिक्त बोजा नागरिकांवर पडू देणार नाही, असं दिल्ली सरकारने ठरवलं आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकार केंद्र सरकारच्या अखत्यारीतील 'नाफेड' (NAFED - National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd) कडून कांदा आणि साखर खरेदी करणार आहे आणि राजधानीतील वेगवेगळ्या ठिकाणी ते उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करेल. नाफेडकडून ज्या दरात माल मिळेल, त्याच दरात तो विकला जाईल. वाहतूक आणि इतर खर्चाचा भार दिल्ली सरकार उचलणार आहे.

दिल्लीत येणाऱ्या कांद्याच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याचे, तो बाजारात व्यवस्थित पोहोचतोय की नाही हे पाहण्याचे आणि साठेबाजी रोखण्याचे निर्देश विभागाला देण्यात आले आहेत, असं मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितलं.

सविस्तर कृती आराखड्याचे आदेश

या बैठकीला अन्न आणि पुरवठा मंत्री सरदार मनजिंदर सिंग सिरसा आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कांदा आणि साखरेच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन, मुख्यमंत्र्यांनी विभागाला एक सविस्तर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. यामध्ये दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प लावून लोकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करून देण्याचा विचारही समाविष्ट आहे.

सिरसा म्हणाले की, बाजारात कांद्याचे भाव आणखी वाढल्यास त्याचा फटका दिल्लीतील नागरिकांना बसू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नाफेडकडून ज्या किमतीत कांदा मिळेल, त्याच किमतीत तो लोकांना विकला जाईल. वाहतूक आणि इतर खर्च दिल्ली सरकार उचलेल आणि कोणत्याही परिस्थितीत दिल्लीच्या लोकांवर कोणताही अतिरिक्त बोजा टाकू देणार नाही.

साठेबाजीवर होणार कारवाई

अन्न आणि पुरवठा मंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी साठवणुकीवर मर्यादा घातली आहे. दिल्ली सरकारही या नियमांनुसार कारवाई करेल. कुठेही मर्यादेपेक्षा जास्त साखर साठवलेली आढळल्यास जबाबदार लोकांवर कारवाई केली जाईल.

लोकांना स्वस्त दरात साखर कशी उपलब्ध करून देता येईल, याचाही आढावा घेण्याचे निर्देश विभागाला दिले आहेत. यासाठी एक सविस्तर योजना मागवण्यात आली आहे.