Pune Female Cops Wedding : पुण्यातल्या दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल्सचं लग्न ऐनवेळी रद्द झालं आहे. घरच्यांच्या विरोधामुळे हे लग्न मोडल्याचं बोललं जातंय, पण यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यापैकी एकीने लिंगबदल उपचारांची तयारीही सुरू केली होती, असंही कळतंय.

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील दोन महिला कॉन्स्टेबल्सचं लग्न ऐनवेळी रद्द झालं आहे. या दोघींनी ३० ऑगस्ट रोजी आळंदीमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नाची सगळी तयारी झाली होती, पत्रिका वाटायला सुरुवात झाली होती आणि रजेसाठी अर्जही केला होता. पण, लग्नाच्या काही दिवस आधीच हा सोहळा रद्द करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी मात्र लग्न का रद्द झालं याचं अधिकृत कारण सांगितलेलं नाही.

पोलीस भरतीत झाली ओळख

या दोघींची पहिली ओळख पोलीस भरतीच्या वेळी झाली होती. साधारण तीन वर्षांपूर्वी त्यांची कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी एकत्रच प्रशिक्षण पूर्ण केलं. सुरुवातीला दोघीही पोलीस मुख्यालयात कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची एकाच पोलीस स्टेशनमध्ये पोस्टिंग झाली आणि त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. यानंतर त्यांनी लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.

लग्न ठरलं, पण...

मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी एका कॉन्स्टेबलच्या घरच्यांचा या नात्याला कडाडून विरोध होता. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन हे लग्न थांबवण्याची मागणी केली होती, असंही बोललं जातंय. 'इंडिया टुडे'च्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी ही वैयक्तिक बाब असल्याचं सांगत जास्तीत जास्त समुपदेशन (Counselling) करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, घरच्यांच्या विरोधामुळेच लग्न रद्द झालं का, यावर कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

लिंगबदल उपचारांची तयारी

असंही समोर आलं आहे की, लग्नाचा निर्णय झाल्यानंतर यापैकी एकीने लिंगबदल करण्यासाठी मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू केले होते. पण, या उपचारांचा आणि लग्न रद्द होण्याचा काही संबंध आहे का, हे स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे, याच पिंपरी-चिंचवड पोलीस दलात याआधी एका महिला अधिकाऱ्याने लिंगबदल शस्त्रक्रिया करून सरकारी कागदपत्रांवर लिंग बदलण्यासाठी अर्ज केल्याची घटना घडली होती. भारतात प्रौढ व्यक्तींच्या संमतीने असलेले समलिंगी संबंध गुन्हा नसले, तरी समलिंगी विवाहांना अजूनही कायदेशीर मान्यता नाही.