Nashik Crime : पाथर्डी फाटा येथील १७ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट करून महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ९५% गुण असूनही निराशेमुळे हा प्रकार घडल्याचे दिसत आहे.
Nashik Crime : नाशिकमध्ये शनिवार (४ ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेआठ वाजता गंगापूर रोड परिसरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून आशिष नावाच्या एका मुलाने उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नक्की काय आहे प्रकरण हे जाणून घेऊ.
हुशार विद्यार्थी; एकुलता एक मुलगा
आशिष हा आई-वडिलांसह पाथर्डी फाटा येथे राहत होता. वडील खासगी कंपनीत कार्यरत असून तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. नुकतेच त्याने अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेतला होता. ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून तो अतिहुशार विद्यार्थ्यांच्या यादीत होता, असे महाविद्यालयीन सूत्रांनी सांगितले.
भावनिक पोस्टनंतर मित्रांच्या कमेंट्स
महाविद्यालयात आल्यावर काही वेळातच त्याने भावनिक इन्स्टा पोस्ट अपलोड केली. त्यानंतर ‘अरे अभ्यास कर, वेडेपणा करु नको’ या स्वरूपाच्या कमेंट्स त्याच्या मित्र-मैत्रिणींनी लिहिल्याचेही समोर आले आहे.
शेवटच्या पोस्टचा मजकूर
‘हाय गाइज… तुम्ही मला शेवटचं ऐकत आहात… माझं आयुष्य संपलंय… माझ्यामुळे अनेकांना त्रास झालाय… तीन वर्षांपूर्वीच मी मरणार होतो, पण गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्ष जगलो… सर्वांना धन्यवाद… साइनिंग ऑफ फ्रॉम लाइफ, गूड बाय… व्हेरी व्हेरी सॉरी…’ या आशयाची पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर लिहिली होती.
