मुंबई-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या गाडीचे चाक गरम झाल्याची बाब समोर आली. यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी विलंब झालाच पण मोठी दुर्घटना देखील टळली गेली.
पुणे : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी संध्याकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. बोर घाटाजवळ वंदे भारत एक्स्प्रेसच्या चाकाला अत्याधिक उष्णता निर्माण झाल्यामुळे ट्रेन थांबवावी लागली. हॉट अॅक्सल बॉक्स डिटेक्टर (HABD) सेन्सरने अधिक तापमानाचा इशारा दिल्यानंतर तातडीची कारवाई करत ट्रेनचा वेग कमी करण्यात आला आणि तिला पुणे स्टेशनवर सुरक्षित थांबवण्यात आले.
प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, वंदे भारतचा पुढचा प्रवास रद्द करण्यात आला आणि सर्व प्रवाशांना डेक्कन क्वीन या पर्यायी ट्रेनमधून सोलापूरकडे रवाना करण्यात आले. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा संभाव्य अपघात टळला.
रेल्वे तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ट्रेनच्या चाकांचे सामान्य तापमान ४०°C ते ६०°C दरम्यान असते. ८५°C पेक्षा तापमान वाढल्यास HABD प्रणाली अलर्ट पाठवते. या घटनेत चाकाचे तापमान १००°C च्या जवळ पोहोचले होते, ज्यामुळे ही यंत्रणा सक्रिय झाली आणि तातडीने ट्रेन थांबवावी लागली.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना पुणे स्टेशनवर डेक्कन क्वीनमध्ये हलवण्यात आले. संध्याकाळी ७:१४ वाजता डेक्कन क्वीन पुण्याहून सोलापूरकडे रवाना झाली आणि मध्यरात्रीच्या सुमारास ती सोलापूरला पोहोचली.
मध्य रेल्वेवरील ही अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रवाशांमध्ये ही बातमी समजताच काहीसा संभ्रम निर्माण झाला, मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या जलद कारवाईमुळे सर्व प्रवासी सुरक्षित होते आणि त्यांनी आपला प्रवास पूर्ण केला.या घटनेमुळे वंदे भारत एक्स्प्रेसच्या तांत्रिक देखभालीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यापुढील काळात अशा त्रुटी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अधिक काटेकोर तपासणी होणे गरजेचे आहे, अशी प्रवाशांची भावना आहे.


