मुंबईत सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून, काही ठिकाणी पाणी साचल्याने आणि दृश्यमानता कमी झाल्याने लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. मेनलाइन आणि हार्बरलाइन दोन्ही मार्गांवरील गाड्या १० ते १५ मिनिटे उशिरा आहेत. 

मुंबई : मुंबईत सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून, काही ठिकाणी पाणी साचल्याने लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. मेनलाइन आणि हार्बरलाइन दोन्ही मार्गांवरील गाड्या जवळपास १० ते १५ मिनिटे उशिरा आहेत. प्रशासनाने अनुचित प्रकार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली असून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

रेल्वेच्या वतीने काय सांगण्यात आलं? 

आतापर्यंत उपलब्ध असलेल्या अहवालानुसार, हार्बर मार्गावरील कुर्ला, चेंबूर, टिळकनगर या ३-४ स्थानकांवर पाणी साचण्याची समस्या आहे आणि या स्थानकांवरील पॉइंट्सना क्लॅम्प करण्यात आले आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील गाड्या सुमारे १०-१५ मिनिटे उशिराने धावत आहेत. मेनलाइनवर सुमारे ८-१० मिनिटांचा उशीर होत आहे, परंतु कर्जत ते कल्याण, कसारा ते कल्याण तसेच कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गांवर मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने गाड्या कमी वेगाने धावत आहेत..."

"पूर्वी पाणी साचण्याची शक्यता असलेल्या विविध ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ, विशेषतः अभियांत्रिकी मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे आणि त्यांना पुरेसे पाणी काढण्याचे साहित्य पुरवण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी उच्च क्षमतेचे पंप बसवण्यात आले आहेत. दरम्यान, हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये २४ तासांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे.

ऑरेंज अलर्ट जारी - 

मुंबई, रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट या भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सर्व शाळांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी दुपारच्या सत्रात सर्व शाळा बंद राहतील, असे BMC च्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. नागरिकांनी अत्यंत आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही महानगरपालिकेने केले आहे. कोणत्याही आणीबाणीच्या किंवा अधिकृत माहितीसाठी, नागरिकांनी BMC च्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (ANI)