- Home
- Maharashtra
- एसटीचा 'मास्टरस्ट्रोक'! आता २० दिवसांच्या भाड्यात महिनाभर प्रवास; MSRTC ची नवी ई-बस पास योजना लाँच
एसटीचा 'मास्टरस्ट्रोक'! आता २० दिवसांच्या भाड्यात महिनाभर प्रवास; MSRTC ची नवी ई-बस पास योजना लाँच
MSRTC New Bus Pass Scheme : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने MSRTC नोकरदार, विद्यार्थ्यांसाठी एक नवीन पास योजना आणली. या योजनेअंतर्गत, प्रवाशांना केवळ २० दिवसांचे भाडे भरून महिनाभर आणि ६० दिवसांचे भाडे भरून तीन महिने प्रवास करता येणार आहे.

एसटीचा 'मास्टरस्ट्रोक'! आता २० दिवसांच्या भाड्यात महिनाभर प्रवास
मुंबई : दररोज लालपरीने किंवा ई-बसने प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. प्रवाशांच्या खिशाला परवडणारी आणि पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देणारी 'नवीन मासिक आणि त्रैमासिक पास योजना' जाहीर करण्यात आली आहे. "२० दिवसांचे भाडे भरा आणि ३० दिवस बिनधास्त प्रवास करा," असे या योजनेचे मुख्य आकर्षण आहे.
'जितका प्रवास, तितकी जास्त बचत!'
एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारली आहे. खासगी वाहनांचा वापर कमी करून नागरिकांनी आरामदायी ई-बसकडे वळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे
मासिक पास (Monthly Pass): ३० दिवसांच्या प्रवासासाठी तुम्हाला केवळ २० दिवसांचेच भाडे द्यावे लागेल. म्हणजेच १० दिवसांचा प्रवास पूर्णपणे मोफत!
त्रैमासिक पास (Quarterly Pass): ९० दिवसांच्या प्रवासासाठी ६० दिवसांचे भाडे आकारले जाईल. येथे तब्बल एका महिन्याचे भाडे वाचणार आहे.
कोणत्या बसेससाठी ही सवलत लागू?
ही सवलत महामंडळाच्या ताफ्यातील ९ मीटर आणि १२ मीटर ई-बसेस तसेच 'ई-शिवाई' बस सेवेसाठी लागू असेल. सध्या एसटीच्या ताफ्यात साधारणपणे ५०० हून अधिक ई-बसेस धावत असून, आगामी काळात ही संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे.
मुंबई-ठाणे-अलिबाग प्रवाशांची चांदी!
मुंबईहून ठाणे, अलिबाग, बोरिवली अशा मार्गांवर रोज ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. या मार्गांवर आधीच ई-बस सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने, प्रवाशांना आता वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत करता येईल.
महत्त्वाची टीप
ही योजना प्रामुख्याने एकाच मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या नोकरदार, व्यावसायिक आणि महाविद्यालयीन तरुणांना डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आली आहे.

