सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात विजेच्या करंटमुळे दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे गोठ्यात करंट उतरल्याने एका गाईसह कुटुंबातील सासू आणि सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याचं दिसून आलं आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं असून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून आलं आहे. माळशिरस तालुक्यामध्ये विजेच्या करंटमुळे दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.
सासू-सुनेचा विजेचा धक्का लागून मृत्यू
पावसामुळं गुरांच्या गोठ्यात करंट उतरल्यामुळं एका गाईसह कुटुंबातील २ महिलांचा मृत्यू झाला आहे. माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील ढवळे वस्तीवर ही दुर्दैवी घटना झाली असून यात सानिकाबाई विठ्ठल रेडे (वय 57) आणि सुवर्णा अमोल रेडे (वय 27) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सानिकाबाई या सकाळी ६ वाजताच्या सुमारास गोठ्यामध्ये गेल्या होत्या. त्याठिकाणी गेल्यानंतर त्यांना गाई जमिनीवर पडलेली दिसली. यावेळी त्यांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती उठत नव्हती. तिला हात लावल्यानंतर सानिकाबाई यांना करंट बसला. त्यांचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला, त्यानंतर त्यांची सून सुवर्ण या गोठ्यात गेल्या.
त्यांनी सासू जमिनीवर का पडली आहे म्हणून त्यांना हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा जागेवरच धक्कादायक मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील सासू आणि सून या दोघींचा मृत्यू झाल्यामुळं माळशिरस तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता
दरम्यान, रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे गोठ्याच्या पत्राशेडमध्ये पाणी साचून, तिथे शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास अकलूज पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी दीपक भोसले करत असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला आहे.
