Montha Cyclone : बंगालच्या खाडीत ‘मोंथा’ चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील डिप डिप्रेशनमुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट वाढलं आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Montha Cyclone : दक्षिण पश्चिम आणि त्याच्या आसपासच्या भागात पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीत ‘मोंथा’ चक्रीवादळाने जोर धरला आहे. रात्री उशिरा हे चक्रीवादळ काकीनाड, मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनमच्या किनाऱ्यांवरून जाण्याची शक्यता** हवामान खात्याने वर्तवली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 100 ते 120 किमी प्रतितासपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, पूर्व-मध्य अरबी समुद्रात डिप डिप्रेशन तयार झालं असून ते उत्तर-पूर्व दिशेने सरकत आहे. मुंबईपासून सुमारे 620 किमी अंतरावर हे डिप्रेशन सक्रिय झाले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे.

सायक्लोनिक सर्क्युलेशनचा उत्तरेकडे धोका

हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेल्या डिप डिप्रेशनसोबत सायक्लोनिक सर्क्युलेशनही उत्तरेकडे सरकत आहे. त्याची टर्फलाइन महाराष्ट्र आणि गुजरातमधून जाते आहे. पश्चिम बंगालच्या खाडीत मोंथा चक्रीवादळ सक्रिय असल्याने वाऱ्यांच्या दिशेत मोठा बदल दिसून येत आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत पावसाचा मुक्काम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम, मेघगर्जनेसह सरींचा अंदाज

मागील २४ तासांत कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. आजदेखील हवामान विभागानुसार मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विदर्भात ऑरेंज अलर्ट

२९ ऑक्टोबर रोजी विदर्भात अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र शेजारील काही राज्यांमध्ये चक्रीवादळामुळे रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून, ३० ऑक्टोबर रोजीही पावसाचे सत्र कायम राहील. गुजरातमध्येही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

थंडीचा इशारा; ला निनामुळे हवामानात मोठे बदल

३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात हलका पाऊस राहील, मात्र त्यानंतर कडाक्याची थंडी येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.‘ला निनो’ हवामान परिणामामुळे प्रशांत महासागरात झालेल्या बदलांचा परिणाम भारतातही जाणवणार आहे. मागच्या २५ वर्षांत न पडलेली थंडी यंदा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.