- Home
- Maharashtra
- Bengaluru-Mumbai New Superfast Train: बंगळुरु-मुंबई मार्गावर नवी सुपरफास्ट एक्सप्रेस; 'हा' असेल नवा आणि जलद मार्ग!
Bengaluru-Mumbai New Superfast Train: बंगळुरु-मुंबई मार्गावर नवी सुपरफास्ट एक्सप्रेस; 'हा' असेल नवा आणि जलद मार्ग!
Bengaluru-Mumbai New Superfast Train: रेल्वे मंत्रालयाने बंगळुरु-मुंबई मार्गावर एका नव्या सुपरफास्ट एक्सप्रेसला मंजुरी दिली आहे. ही ट्रेन बेळगाव, मिरज आणि सांगलीमार्गे धावणार असून, यामुळे प्रवाशांना एक जलद आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल.

बंगळुरु-मुंबई मार्गावर नवी सुपरफास्ट एक्सप्रेस
मुंबई: प्रवाशांसाठी मोठी बातमी! मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बंगळुरु-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसला अखेर रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटीनंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
काय आहे नवीन?
या नव्या सुपरफास्ट एक्सप्रेसमुळे बेळगाव, मिरज आणि सांगलीमार्गे मुंबई आणि बंगळुरुला जोडणारी आणखी एक जलद आणि आधुनिक ट्रेन उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत या दोन शहरांना जोडणारी 'उद्यान एक्सप्रेस' प्रामुख्याने सोलापूर-गुंटकल मार्गे धावत होती. आता या नव्या एक्सप्रेसमुळे प्रवाशांना एक नवा आणि सोयीस्कर पर्याय मिळाला आहे.
या जिल्ह्यांना मिळणार थेट कनेक्टिव्हिटी
या नवीन मार्गामुळे केवळ मुंबई-बंगळुरुच नव्हे, तर बेळगाव, हुबळी, धारवाड, हावेरी आणि दावणगेरी हे प्रमुख जिल्हे थेट जोडले जाणार आहेत. बेळगावमधून मुंबईकडे जाण्यासाठी ही ट्रेन एक उत्तम सोय ठरणार आहे.
मिरज-सांगलीच्या प्रवाशांची सोय
सध्याच्या गाड्यांमध्ये मिरज आणि सांगलीच्या प्रवाशांसाठी असलेला मर्यादित तिकीट कोटा यामुळे वाढणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्याच्या गाड्यांवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी ही नवीन सुपरफास्ट एक्सप्रेस अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरावत यांनी स्पष्ट केले आहे. या नव्या एक्सप्रेसचे वेळापत्रक आणि अधिकृत तपशील लवकरच रेल्वेकडून जाहीर केला जाईल.

