मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असताना, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली. 

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले असून या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदान गाठलं.

जरांगे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं आणि मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी माध्यमांशी बोलताना सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकदिवसीय विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण लागू करण्याची विनंती केली.

मात्र, सुप्रिया सुळे परतीच्या मार्गावर असताना वातावरण अचानक तापलं. काही आंदोलकांनी त्यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. "एक मराठा, लाख मराठा" अशा घोषणा देत काही आंदोलक आक्रमक झाले. एवढंच नव्हे, तर काहींनी त्यांच्या गाडीवर बाटल्याही फेकल्या. अशा प्रकारच्या कृतीमुळे परिसरात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली.

ही घटना घडताच मुंबई पोलीस तात्काळ सतर्क झाले आहेत. आझाद मैदानात आधीपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात होता, पण या घटनेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोणतीही अनपेक्षित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

दरम्यान, आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून आलेले मराठा आंदोलक आता मुंबईच्या विविध भागांमध्येही दिसत आहेत. काही आंदोलक मरीन ड्राइव्ह परिसरात फिरताना दिसले, तर काहींनी थेट समुद्रात उतरण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना समुद्राबाहेर काढले आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन केले. संपूर्ण शहरात आता मराठा आंदोलनाचा ताप जाणवत असून मुंबई पोलीस आंदोलकांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्ण दक्ष आहेत.