मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावर जरांगेंने प्रतिउत्तर दिले आहे. जरांगे यांनी राज ठाकरे यांना त्यांचा मुलगा निवडणुकीत पडला तरीही भाजपाची री ओढताय असे म्हटले.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण सुरू केलं आहे. 31 ऑगस्ट रोजी त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस होता. याचदरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडत एकनाथ शिंदेंकडेच सर्व प्रश्नांची उत्तरं असल्याचं सांगितलं. “मनोज जरांगे पुन्हा का आले, हेही शिंदेंना विचारा,” असं म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना कात्रीत पकडल्याचं चित्र दिसलं.

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर जरांगेंची सडकून टीका

राज ठाकरेंच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, तरी भाजपची री ओढताय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील,” अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंना इशारा दिला.

“आम्ही काही विचारलं का तुम्हाला?”

मनोज जरांगे म्हणाले, “तुम्हाला आम्ही काही विचारलं का? मग तुम्ही आम्हाला का सल्ला देता? आम्ही 11 आमदार दिले तेव्हा आम्ही म्हटलं का की मराठवाड्यात येऊ नका? मग तुम्हीही आम्हाला का विचारता? केव्हापर्यंत भाजपची री ओढणार? ठाकरे ब्रँडचं अस्तित्व तुम्हीच खराब करताय. स्वतःचं पोरगं निवडणुकीत पडलं. हुशार राजकारणी असूनही डोक्याने वागत नाही. नाही तर फडणवीसच तुम्हाला संपवून टाकतील.”

“भाजपकडून वापरले जात आहात”

यावेळी त्यांनी भाजपकडून राज ठाकरेंचा होणारा वापरही अधोरेखित केला. “मुख्यमंत्री फडणवीसच्या घरी जेवलात म्हणजे तुमचा कार्यक्रम ठरलाच म्हणून समजा. तुम्हाला वाटतं तुम्ही हुशार आहात, पण गरीब मराठ्यांना सगळं कळतं. निवडणुका आल्या की भाजप तुम्हाला जवळ धरतं, पण मतदानानंतर तुम्हाला दुर लोटून देतात,” असा आरोप जरांगेंनी केला.

“ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजप घाबरतं”

मनोज जरांगे पाटील यांनी पुढे टीका करताना म्हटलं की, “नगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात जर ठाकरे बंधूंनी एकत्र कार्यक्रम घेतला तर भाजप भयभीत होतं. त्यामुळे मुख्यमंत्री तुमच्या घरी जेवायला गेले आणि तुम्ही खुश झालात, पण त्यातच तुमचा पक्ष खड्ड्यात गेला,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.