मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. आरक्षण न मिळाल्यास मराठे मुंबईकडे कूच करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

मुंबई: मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठ्यांना येत्या काही दिवसांमध्ये आरक्षण मिळाले नाही तर सर्व मराठे हे घराच्या बाहेर पडतील आणि मुंबईकडे कूच करतील असं विधान जरांगे यांनी केलं आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलकांना त्रास देऊ नये अन्यथा मुंबई जाम करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

शनिवारी कोंडी राहिली कायम 

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कोंडी कायम राहिली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीच्या अध्यक्ष आणि मनोज जरांगे यांची भेट शनिवारी झाली. मराठवाड्यातील सर्व मराठे हे कुणबी असल्याचे जाहीर करा, आणि औंध, मुंबई गव्हर्न्मेंट गॅझेटच्या नोंदी शोधून दोन महिन्यांत प्रमाणपत्रे द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली. मात्र यावर तोडगा न निघाल्यामुळे चर्चा निष्फळ ठरली.

एक दिवसाची मिळाली मुदतवाढ 

मराठा आंदोलकांना सरकारच्या वतीने एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. रविवारपर्यंत आझाद मैदानावर उपोषणाला बसता येणार आहे. शनिवारी प्रथमच राज्य सरकारने जरांगे यांच्याशी बोलायला सुरुवात केली. न्या. शिंदे यांनी शिष्टमंडळासह शनिवारी जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली.

मराठवाड्यातील मराठे हे कुणबी आहेत हे जाहीर करा 

मराठवाड्यातील मराठे हे कुणबी आहेत हे जाहीर करा अशी आग्रही मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. हैदराबाद आणि सातारा गॅझेटचे प्रमाणपत्र वाटावे असे जरांगे यांनी यावेळी बोलताना म्हटलं होत. यावर समितीच्या वतीने आम्हाला वेळ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली पण मनोज जरांगे यांनी आता वेळ देण्यात येणार नाही असं स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं आहे.