Vidhan Parishad Election 2026 : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. 17 जागांपैकी भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
Vidhan Parishad Election 2026 : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर आणि विविध मतदारसंघांवरील दावे-प्रतिदाव्यांनंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतिम फॉर्म्युल्यावर एकमत झाले आहे. त्यानुसार 17 जागांपैकी भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवणार आहे.

भाजपला सर्वाधिक 11 जागा; उमेदवारांची अधिकृत घोषणा
महायुतीतील सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या भाजपला सर्वाधिक 11 जागांचा वाटा मिळाला आहे. पक्षाने अनेक विद्यमान आणि अनुभवी नेत्यांना पुन्हा संधी दिली आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून अरुण लखाणी, अमरावतीमधून प्रवीण पोटे, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, नागपूरमधून राजीव पोतदार यांसारख्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय भंडारा-गोंदिया, सांगली-सातारा, अहिल्यानगर, नांदेड, धाराशिव-लातूर-बीड, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघांसाठीही भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे.
शिवसेनेचे चार उमेदवार जवळपास निश्चित
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला चार जागा देण्यात आल्या आहेत. ठाणेमधून रवींद्र फाटक, नाशिकमधून नरेंद्र दराडे आणि परभणी-हिंगोलीमधून सईद खान यांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. यवतमाळ मतदारसंघासाठी दुष्यंत चतुर्वेदी, किरण पांडव आणि सलीम खातून यांच्यापैकी एका नावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागांवर मैदानात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागांचा वाटा मिळाला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर पुणे मतदारसंघातून विक्रम काकडे यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे.
अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या जागांसाठी निवडणूक
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे विधान परिषदेच्या अनेक जागा गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त आहेत. संबंधित मतदारसंघांमध्ये आवश्यक 75 टक्के मतदारसंख्या उपलब्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.विधान परिषदेतील एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात. यापैकी 17 जागांसाठी यंदा निवडणूक होत आहे.
निवडणुकीचे महत्त्वाचे वेळापत्रक
- अधिसूचना जारी : 25 मे 2026
- उमेदवारी अर्जाची अंतिम तारीख : 1 जून 2026
- अर्ज छाननी : 2 जून 2026
- अर्ज माघारीची अंतिम मुदत : 4 जून 2026
- मतदान : 18 जून 2026 (सकाळी 8 ते दुपारी 4)
- मतमोजणी : 22 जून 2026
कोणत्या जागा कोणाकडे होत्या?
या निवडणुकीत अनेक विद्यमान आणि माजी आमदार पुन्हा रिंगणात उतरले आहेत. सोलापूरमध्ये भाजपचे प्रशांत परिचारक, ठाण्यात शिवसेनेचे रवींद्र फाटक, पुण्यात राष्ट्रवादीचे अनिल भोसले, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये अनिकेत तटकरे यांसारख्या नेत्यांनी यापूर्वी या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ जागावाटपच नव्हे, तर स्थानिक पातळीवरील राजकीय वर्चस्वाचीही परीक्षा लागणार आहे.


