मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापले असून, पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत, तर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे त्यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केले असून या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पंकजा मुंडे काय म्हणाल्या? 

जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. उपोषणकर्त्यांशी सातत्याने संवाद साधावा तसेच त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. उन्हाच्या तीव्रतेमध्ये सुरू असलेल्या या उपोषणामुळे जरांगे पाटील यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी स्वतः जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.

जरांगे पाटील यांची घेतली भेट 

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत आंदोलनाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली. जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करण्यात सरकारने विलंब करू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणासह कुणबी प्रमाणपत्र, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, सारथीच्या योजना पुन्हा सुरू करणे आणि मराठा समाजाशी संबंधित इतर मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. यापूर्वीही सरकारशी चर्चा झाली होती, मात्र समाधानकारक तोडगा न निघाल्याने त्यांनी पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतला.

या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पुढील काही दिवसांत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा मोठी राजकीय आणि सामाजिक घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.