Maharashtra Weather Update :मार्चच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. 3 मार्च धुलीवंदनाच्या दिवशी राज्यभर उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. कोकणात दमट उकाडा तर विदर्भात सर्वाधिक तापमान नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील हवामानात मार्च महिन्यापासून मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उन्हाचा पारा चढताना दिसत आहे. ३ मार्च रोजी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर प्रामुख्याने उष्ण आणि कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कोकण विभागात दमट उकाडा

कोकण विभागातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे उष्ण आणि दमट वातावरण राहील. मुंबईत कमाल तापमान २९ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ ते २६ अंश दरम्यान राहील. दुपारी कडक ऊन आणि समुद्रकिनारी भागात वाढलेला दमटपणा जाणवेल.

पश्चिम महाराष्ट्रात तापमान ३४ अंशांपर्यंत

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर आणि सातारा परिसरात कमाल तापमान ३१ ते ३४ अंश, तर किमान तापमान १६ ते १९ अंश राहील. दुपारच्या सुमारास उष्णतेची तीव्रता वाढेल.

उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढ

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार येथे दिवसा तापमान ३३ ते ३५ अंशांदरम्यान राहील. किमान तापमान १८ ते २१ अंश दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात कोरडे वातावरण

मराठवाडा विभागातील संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी आणि धाराशीव येथे कमाल तापमान ३३ ते ३६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हवामान प्रामुख्याने कोरडे राहील.

विदर्भात सर्वाधिक उष्णता

विदर्भ विभागातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा येथे कमाल तापमान ३४ ते ३७ अंशांपर्यंत पोहोचू शकते. दुपारी कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यांची झुळूक जाणवेल.

 नागरिकांसाठी सूचना

एकंदरीत ३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कोरडे आणि उन्हाळी हवामान राहील. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घ्यावी, डोके झाकावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी.