Maharashtra Weather : परतीच्या पावसाला जोर! पुढील 48 तासांत महाराष्ट्राला झोडपणार
Maharashtra Weather : परतीचा मॉन्सून असूनही महाराष्ट्रात पुढील 48 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे.

पुढील 24 तासांचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील 24 तासांत कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मध्यम ते अतिमुसळधार पावसाच्या सरींची शक्यता आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी राहील असा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही तुरळक सरींचा अंदाज आहे.
पुढचे दोन ते तीन दिवस पावसाचे
हवामान विभागानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणात पुन्हा मुसळधार पाऊस होणार असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गमधील कुडाळ तालुक्यातील वालावल, जळगाव जिल्ह्यातील जामनेर, वाकडी, पिंपळगाव, वरखेडी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी, पालशी, पाथर्डी आणि कारेगाव या मंडळांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
सतर्कतेचा इशारा
- मेघगर्जनेसह पाऊस : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, चंद्रपूर, नागपूर.
- मध्यम स्वरूपाचा पाऊस : मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर.
शेतकरी हवालदिल
ऑगस्ट व सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. तब्बल 17 लाख 85 हजार 714 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी दिली. काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना मदत दिली गेली असून उर्वरित पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
परतीच्या पावसाचा प्रवास कुठवर?
पाऊस परतीच्या मार्गावर लागला असला तरी त्याचा जोर अजूनही कमी झालेला नाही. मागील 48 तासांपासून पश्चिम राजस्थानातून माघार घेत, मंगळवारी मॉन्सून राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून परतला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

