- Home
- Maharashtra
- महाराष्ट्रावर 'अस्मानी' संकट! पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे; १८ जिल्ह्यांना 'यलो' तर १३ जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट', पाहा तुमच्या शहराची स्थिती
महाराष्ट्रावर 'अस्मानी' संकट! पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे; १८ जिल्ह्यांना 'यलो' तर १३ जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट', पाहा तुमच्या शहराची स्थिती
Maharashtra Weather Update: हवामान विभागाने महाराष्ट्रातील ३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रावर 'अस्मानी' संकट! पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे
मुंबई: मार्च महिन्याचा शेवट गोड होण्याऐवजी राज्यावर अवकाळी पावसाचे सावट गडद झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्याच्या ३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. ताशी ६० किमी वेगाने वाहणारे वारे आणि काही ठिकाणी होणारी गारपीट यामुळे शेतीसह जनजीवनावर मोठा परिणाम होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.
विभागानुसार हवामानाचा सविस्तर अंदाज
१. उत्तर महाराष्ट्र: गारपिटीचा मोठा धोका
नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. येथे वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. तर धुळे आणि नंदुरबारमध्ये 'यलो अलर्ट' असून पावसाच्या सरी कोसळतील.
२. पश्चिम महाराष्ट्र: पुणे-सातारा सतर्क!
पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह येथे ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील. कोल्हापूर जिल्ह्याला मात्र 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
३. मराठवाडा: बळीराजाची चिंता वाढली
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' असून येथे पावसाचा जोर अधिक असेल. लातूर, धाराशिव आणि नांदेडमध्ये 'यलो अलर्ट' असून विजांचा धोका कायम आहे.
४. कोकण आणि मुंबई: मेघगर्जनेची शक्यता
मुंबई आणि पालघरमध्ये हलक्या पावसाची शक्यता असली तरी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पट्ट्याला 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यालगत वाऱ्याचा वेग जास्त राहू शकतो.
५. विदर्भ: विजांचा कडकडाट
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट' आहे. विदर्भात विजा पडण्याचे प्रमाण अधिक राहू शकते, त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी आणि नागरिकांसाठी विशेष सूचना
कापणीला आलेला माल: पिके किंवा शेतमाल तातडीने सुरक्षित जागी हलवावा.
विजांपासून संरक्षण: विजा चमकत असताना झाडाखाली, मोबाईल टॉवरजवळ किंवा मोकळ्या मैदानात थांबू नका.
वाहतूक: वादळी वाऱ्यामुळे जुन्या इमारती किंवा झाडे पडण्याची शक्यता असल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी.

