विधानसभेत जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्यानंतर रोहित पवार यांच्याकडून आव्हाडांची पाठराखण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचाच फटका आता चौकशीच्या निमित्ताने रोहित पवारांना बसलेला दिसून येत आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांची अडचण वाढली आहे. अलीकडेच सक्तवसुली संचालनालय (ED) कडून रोहित पवार आणि काही इतर व्यक्तींविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. हे आरोपपत्र मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात सादर करण्यात आले असून, कोर्टाने त्याची दखल घेतली आहे
कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
विशेष पीएमएलए कोर्टाने या आरोपपत्राची गंभीर दखल घेत, आमदार रोहित पवार, व्यापारी राजेंद्र इंगवले आणि बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनी यांना समन्स बजावले आहेत. कोर्टाने सर्व आरोपींना २१ ऑगस्ट रोजी वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात रोहित पवार आणि इंगवले हे प्रथमदर्शनी या आर्थिक गैरव्यवहारात जाणूनबुजून सहभागी असल्याचे कोर्टाने नमूद केले आहे.
५० कोटींच्या मालमत्तेचा समावेश
ईडीने यापूर्वी बारामती अॅग्रो लिमिटेडच्या मालकीची सुमारे ५० कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. यात संभाजीनगरच्या कन्नड येथील १६१.३० एकर जमीन, साखर कारखाना, यंत्रसामग्री आणि इमारतींचा समावेश होता. ईडीच्या मते, ही मालमत्ता कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेड (कन्नड एसएसके) ची असून, ती बनावट लिलाव प्रक्रियेद्वारे बेकायदेशीरपणे विकत घेण्यात आली होती.
लिलावात पारदर्शकतेचा अभाव
२०१९ मध्ये दाखल एफआयआरनुसार, MSCBचे काही अधिकारी आणि संचालक यांनी अनेक सहकारी साखर कारखाने आपल्या नातेवाईकांना किंवा जवळच्या कंपन्यांना अत्यंत कमी किमतीत विकले. विशेष म्हणजे, २००९ मध्ये MSCBने कन्नड कारखान्यावर ८०.५६ कोटी रुपयांच्या थकित कर्जासाठी ताबा घेतला होता. त्यानंतर संशयास्पद मूल्यांकन करत लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्याला अपात्र ठरवून कारखाना बारामती अॅग्रोकडे देण्यात आला, असा आरोप ईडीने केला आहे.
खटला विशेष पीएमएलए न्यायालयात प्रलंबित
हा संपूर्ण खटला सध्या विशेष पीएमएलए कोर्टात सुरू असून, ईडीचा तपास अद्यापही सुरू आहे.न्यायालयाच्या आगामी सुनावणीमध्ये या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. यामुळेच रोहित पवार यांच्यासह इतर आरोपींसाठी हे प्रकरण अधिक गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे.


