Myanmar Scam : म्यानमार-थायलंड सीमेवरील 'गोल्डन ट्रँगल' परिसरात नोकरीच्या आमिषाने नेण्यात आलेल्या भारतीय तरुणांना जबरदस्तीने ऑनलाइन फसवणुकीच्या रॅकेटमध्ये काम करायला लावले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
Myanmar Scam : म्यानमार-थायलंड-लाओस सीमेवरील कुप्रसिद्ध ‘गोल्डन ट्रँगल’परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोकरीच्या आमिषाने भारतातील शेकडो तरुणांना परदेशात नेऊन ऑनलाइन फसवणुकीच्या रॅकेटमध्ये जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात भारतातील सुमारे 800 तरुण अडकले. त्यापैकी महाराष्ट्रातील तब्बल 25 जण असल्याचा दावा केला जात आहे. बीडमधील एका तरुणाने मित्राला केलेल्या फोन कॉलमधून या संपूर्ण रॅकेटचा थरारक खुलासा केला आहे.

नोकरीच्या आमिषाने म्यानमारमध्ये पोहोचला
बीडमधील हा तरुण अॅनिमेशन डिझायनर असून, नोकरीच्या शोधात असताना त्याला व्हॉट्सअॅपवर परदेशातील नोकरीची जाहिरात मिळाली. बँकॉकमध्ये सोशल मीडिया व्यवस्थापनाचे काम असल्याचे सांगून त्याला थायलंडला बोलावण्यात आले. पण तेथे पोहोचल्यानंतर त्याची फसवणूक झाली. एका वाहनातून त्याला जंगलाच्या मार्गाने बेकायदेशीररित्या म्यानमारमध्ये नेण्यात आले. बंदुकीचा धाक दाखवत त्याची सर्व कागदपत्रे काढून घेण्यात आली आणि त्याला ऑनलाइन फसवणुकीच्या कामात ढकलण्यात आले.
काम नाही केलं तर मारहाण...
पीडित तरुणाने मित्राला सांगितलेल्या माहितीनुसार, म्यानमारमधील छावण्यांमध्ये शेकडो भारतीय तरुणांना कैद करून ठेवण्यात आले आहे. त्यांना जबरदस्तीने ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यास भाग पाडले जाते. काम करण्यास नकार दिल्यास मारहाण केली जाते. याशिवाय अन्न दिले जात नाही आणि जीव घेण्याची धमकी दिली जाते, असा गंभीर आरोप त्याने केला आहे. त्याने बिहारमधील एका तरुणाची हत्या झाल्याचाही दावा केला. तसेच महाराष्ट्रातील 20 ते 30 तरुण या ठिकाणी अडकल्याचे त्याने मित्राला सांगितले. कैद्यांना केवळ 10 मिनिटांसाठी मोबाईल वापरण्याची परवानगी दिली जात असल्याची माहितीही त्याने दिली.
सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
या धक्कादायक माहितीची खात्री झाल्यानंतर पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी बीड सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच राज्यातील पोलिस प्रशासनाने परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
'सर्वांना सुखरूप भारतात आणा'
पीडित तरुणाच्या मित्राने सांगितले की, तो राजकीय क्षेत्रात सक्रिय असल्याने मदतीसाठी त्याच्याशी संपर्क साधण्यात आला. व्हॉट्सअॅप व्हॉइस कॉलवरून तरुणाने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि स्वतःसह इतर भारतीयांना वाचवण्याची विनंती केली. त्यानंतर कुटुंबीयांना धीर देत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून सर्व भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणावे, अशी मागणीही त्याने केली.


