जुलैच्या सुरुवातीपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पण आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनचा जोर आता कमी होण्याची शक्यता आहे. 

मुंबई :  मुंबई, पुणे, कोकण आणि उत्तर महाराष्ट्राला पावसाने गेल्या काही दिवसांपासून झोडपून काढले. पण पावसाचा जोर आता कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यातील बहुतांश भागांतील पावसाचा प्रभाव कमी होऊ शकतो. तसेच पुढील काही दिवस मुख्यतः विदर्भातच मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूरग्रस्त आणि पावसामुळे त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

नाशिकवरील मोठे संकट टळले

नाशिक जिल्ह्यासाठी आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मात्र हवामानातील बदलामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. वाऱ्याची दिशा बदलल्याने नाशिककडे सरकणारे अतिवृष्टीचे ढग अकोलेमार्गे पुढे सुरतच्या दिशेने वळले गेले आहेत. मात्र, नाशिकच्या घाटमाथ्यावर आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात अजूनही मुसळधार पावसाचा धोका कायम आहे. यामुळे येथे प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

विदर्भात ऑरेंज आणि यलो अलर्ट कायम

राज्यातील इतर भागांत पावसाचा जोर कमी होत आहे. मात्र  विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी अजूनही सतर्कतेचा इशारा कायम आहे. अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्यापासून या भागात यलो अलर्ट राहणार आहे. नागपूर, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी 9 जुलैला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रात काय परिस्थिती?

पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आजही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट कायम आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर यलो अलर्ट राहणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट आहे. तर घाट परिसरासाठी रेड अलर्ट कायम आहे. नंदुरबार जिल्ह्यातही आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. मात्र उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट आहे. जळगावमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. धुळे आणि अहिल्यानगरमध्ये उद्यापासून पावसाचा जोर जवळपास पूर्णपणे ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कोकण आणि मुंबई-ठाण्याला मोठा दिलासा

सलग पाच दिवस मुसळधार पावसाने कोकण आणि मुंबई महानगर परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण केली होती. मात्र, आता या भागातही पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट तर उद्यापासून यलो अलर्ट असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट आहे. तर सिंधुदुर्गसाठी आजपुरता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट आहे. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा आणि उल्हासनगर परिसरात उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली गेली. यामुळे पुरस्थिती निर्माण झाली. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यने पूरस्थिती निवळण्याची शक्यता आहे.  पालघर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबईत 'यलो अलर्ट'; उद्यापासून पावसाला विश्रांती

मुंबईसाठी आधी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. पण पावसाचा जोर कमी होणार असल्याने यलो अलर्ट दिला गेला आहे. शहरातील काही भागांत ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पण मुसळधार पावसाचा धोका कमी झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्यापासून मुंबईतील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात ओसरणार आहे.