Nashik Cloudburst Rain Update : नाशिकमध्ये आज ढगफुटी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र आता मुसळधार पावसासाठी कारणीभूत असणारा हा भोवरा नाशिक सोडून दुसरीकडेच वळला आहे.
नाशिक : नाशिक, त्र्यंबकेश्वर परिसरात आज ७ जुलै रोजी ढगफुटी होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता. हवामान विभागाने दिलेल्या या इशाऱ्यानंतर खबरदारी घेत नाशिकमधील महापालिका, जिल्हा प्रशासन संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर आहे. आज शाळा, कॉलेजलादेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. काल रात्रभर नाशिकमध्ये तुफान पाऊस झाला. सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पावसासाठी कारणीभूत असणारा भोवरा नाशिकमध्ये सरकून ढगफुटी होण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र आता हा भोवरा नाशिकडे न सरकता दुसरीकडेच गेला आहे. त्यामुळे नाशिकमधील अतिवृष्टी काही प्रमाणात टळल्याचं चित्र आहे.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसासाठी कारणीभूत असणारा भोवरा नाशिकमधून पुढे सरकणार होता. मात्र हा भोवरा आता उत्तरेकडे सूरत आणि दक्षिणेला अहिल्यानगर, अकोले या भागात सरकला आहे. त्यामुळे या भागात आता अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
पावसाचा भोवरा हा सूरत, अकोले, अहिल्यानगरकडे गेल्याने नाशिकमधील ढगफुटीचं, अतिवृष्टीचं संकट कमी झालं आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी भागातील वाहणारे ढग आता सूरत, अकोलेकडे वाहत आहेत. त्यामुळे नाशिकमधील धोका काहीसा टळला असला, तरी नागरिकांनी काळजी घेण्याचं, गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.


