Maharashtra Weather Alert :ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून, २३ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

मुंबई : महाराष्ट्रातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. यामुळे 23 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये दमट वातावरण आणि उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, 7 ऑगस्टपासून हवामानात बदल होण्याची चिन्हे असून, राज्याच्या विविध विभागांत पावसाची शक्यता आहे.

Scroll to load tweet…

विभागांनुसार हवामानाचा अंदाज

कोकण

कोकण किनारपट्टीवर पावसाचे आगमन होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, आणि रायगडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, आणि सातारा घाटमाथा या परिसरांसाठीही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाडा

मराठवाड्यातही पावसाचे पुनरागमन होणार आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, आणि धाराशिव जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट असून, येथे विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, आणि जळगावमध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसतील.

विदर्भ

विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढेल. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यांत मात्र सध्या पाऊस अपेक्षित नाही. या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे आणि नागरिकांनी आपल्या आरोग्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.