- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert : बंगालच्या खाडीतील कमी दाबाचा पट्टा; महाराष्ट्रात 10 नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा
Maharashtra Rain Alert : बंगालच्या खाडीतील कमी दाबाचा पट्टा; महाराष्ट्रात 10 नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा
Maharashtra Rain Alert : बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून पुढील चार दिवस हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 10 नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पाऊस, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर 7 नोव्हेंबरपासून थंडीचा जोर सुरू होणार आहे.

बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा सक्रिय
बंगालच्या खाडीच्या ईशान्य आणि पूर्व-मध्य भागात म्यानमार–बांग्लादेश दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा प्रणाली भारताच्या दिशेनं पुढे सरकत असून पुढील चार दिवसांत ते वादळात परिवर्तित होणार की तीव्रता कमी होणार हे स्पष्ट होईल. दरम्यान, 10 नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पावसाचं संकट कायम राहणार आहे. उत्तरेकडून थंड वारे येत असतानाच सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झालं आहे.
सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे 48 तास सतर्कता
पश्चिम आणि उत्तर भारतात सायक्लोनिक सर्क्युलेशन प्रभावी झाले असून पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. एकूण पाच चक्राकार हवामान प्रणाली तयार झाल्या आहेत. त्यापैकी दोन पश्चिम बंगालच्या खाडीत, एक पाकिस्तानमध्ये आणि एक जम्मू-हिमाचलदरम्यान आहे. मागील 24 तासांत मोठा बदल नसला तरी पुढील तीन दिवसांत तापमानात 2 डिग्रीने घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
10 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम
- महाराष्ट्रात 10 नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पावसाचा धोका कायम आहे.
- 5 नोव्हेंबर: कोकण व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, वादळी वारे आणि मुसळधार पाऊस
- 6 नोव्हेंबर: वारे 30–40 किमी वेगाने; विजांच्या कडकडाटासह पाऊस
- 7 व 8 नोव्हेंबर: हलका पाऊस; त्यानंतर सुधारणा अपेक्षित
कोकणात पावसाची तीव्रता; 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस वादळी वारे आणि मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबरसाठी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक पाऊस
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस हलका पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पाऊस, तर परभणी, बीड, हिंगोली, संभाजीनगर, जालना येथे तुरळक पावसाची शक्यता आहे.
ला निनाचा परिणाम: कडाक्याची थंडी
7 नोव्हेंबरपासून विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची एंट्री होणार असून मुंबई उपनगरातही तापमानात घट जाणवेल. “ला निना” परिस्थितीमुळे यावर्षी मागील 25 वर्षांतली सर्वात जास्त थंडी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी काळात कडाक्याची थंडी राहण्याचा अंदाज आहे.

