- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो अलर्ट; काही ठिकाणी वादळी वाऱ्यांची शक्यता
Maharashtra Rain Alert : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो अलर्ट; काही ठिकाणी वादळी वाऱ्यांची शक्यता
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज विजांसह हलक्या सरींचा अंदाज आहे. सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूरमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यलो अलर्ट जारी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पावसाचे सत्र सुरू असून, आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र, अजूनही काही भागात अधूनमधून सरींचा तडाखा बसत आहे. आज (३ नोव्हेंबर) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा धोका असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तापमानाचा अंदाज
रविवारपर्यंतच्या २४ तासांच्या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली. मुंबई आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. तर काही भागांत उघडीप झाल्याने तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. अनेक शहरांमध्ये तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर नोंदले जात आहे.
हवामानात सातत्याने बदल
राज्यातील अनेक शहरांमध्ये दिवसाच्या तापमानात वाढ जाणवत असून अमरावती येथे कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सिअस तर महाबळेश्वर येथे नीचांकी तापमान १६.४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. दिवस-रात्र तापमानातील चढउतारामुळे सकाळ-संध्याकाळ गारवा, तर दुपारी उकाड्याची परिस्थिती कायम आहे.
पुढील परिस्थिति कशी असेल?
- हवामानातील ही अस्थिरता २-३ दिवस कायम राहण्याची शक्यता
- विजांच्या कडकडाटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन
- खुल्या जागेत मोबाईल वापरणे, झाडांखाली उभे राहणे टाळण्याचा सल्ला
- पावसाचा जोर कमी असला तरी काही भागात गडगडाटी वादळाची शक्यता कायम
शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना
- काढणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवा
- पिकांवर अनावश्यक फवारणी टाळा
- शेतीतील प्लास्टिक कव्हरिंग व्यवस्थित बांधून ठेवा

