- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert: राज्यात २६ जिल्ह्यांना अलर्ट, २ सप्टेंबरला तुफान पावसाचा इशारा!
Maharashtra Rain Alert: राज्यात २६ जिल्ह्यांना अलर्ट, २ सप्टेंबरला तुफान पावसाचा इशारा!
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मंगळवारी पावसाचा जोर वाढणार असून, २६ जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबई : महाराष्ट्रात मंगळवारी पावसाचा जोर वाढणार आहे. २६ जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/0jfY5RaDDx
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 1, 2025
कोकणात मुसळधार, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, उपनगरांत ढगाळ वातावरण
मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील २४ तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहणार असून, काही भागांत पावसाच्या सरी कोसळू शकतात.
पश्चिम महाराष्ट्र, घाटमाथ्यावर सतर्कता आवश्यक
पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, सांगली, सोलापूरसह इतर भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र – नाशिक, धुळे, जळगाव येलो अलर्टमध्ये
नाशिक, त्यातील घाट भाग, तसेच नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात आठही जिल्ह्यांना यलो अलर्ट
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये २ सप्टेंबर रोजी जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
विदर्भात पावसाचा कहर, दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातील ९ जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. पूर्व विदर्भात पावसाची तीव्रता जास्त राहणार असल्याने संभाव्य पूरस्थितीला तोंड द्यावं लागू शकतं.

