Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पाऊस, सोमवारी यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather Alert: नोव्हेंबर महिन्यातही महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, सोलापूर, धाराशिव आणि लातूरमध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

सोमवारी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात यलो अलर्ट
मुंबई: नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली तरी महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट जाणवण्याची शक्यता आहे, विशेषत: पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मे महिन्यापासून सुरु असलेला पावसाळा नोव्हेंबरमध्येही थांबत नाही. मराठवाडा, विदर्भ, मुंबई व कोकणमध्ये रविवारी हलका ते मध्यम पाऊस नोंदवला गेला. त्यानंतर सोमवारी देखील राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.
मुंबई आणि कोकण
कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी ढगाळ वातावरण असेल आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31°C आणि किमान 24°C राहण्याची अपेक्षा आहे. कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती राहणार आहे.
पश्चिम आणि मध्य महाराष्ट्र
पुणे, सांगली आणि सोलापूरमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. सोलापूरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील.
मराठवाडा
धाराशिव, लातूर आणि बीडमध्ये विजांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात 30–40 किमी वेगाने वारे वाहू शकतात. छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, हिंगोली व नांदेडमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ
विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून, तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलकी सरी वगळता, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता नाही.
राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम
मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतरही राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. मराठवाडा व सोलापूर परिसरात पावसाचा जोर वाढत असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. अंदाजानुसार, पुढील 5 नोव्हेंबरपर्यंत हवामानाची हीच परिस्थिती राहणार आहे.

