उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत, ज्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. दिल्ली दौऱ्यापूर्वी त्यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी विमानतळावर चर्चा झाली. शिंदे यांची अमित शहांशी भेट होण्याची शक्यता आहे.

मुंबई : राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीच्या दिशेने रवाना झाले असून, त्यांच्या या दौऱ्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत देखील मुंबई विमानतळावर उपस्थित होते, आणि दोघांमध्ये तिथेच काही वेळ चर्चा झाली.

पावसाळी अधिवेशन, गोंधळाची मालिका आणि मंत्रिमंडळ बदलाची चर्चा

सद्याच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेनेच्या अनेक नेते व मंत्र्यांवर वादंगाची छाया आहे. संजय गायकवाड यांचा कर्मचाऱ्यांना मारहाणीचा प्रकार, संजय शिरसाट यांचं कॅश बॅग प्रकरण, आणि गृहमंत्री योगेश कदम यांचा ‘सावली बार’ संदर्भातील वाद या सर्व प्रकारांनी सरकारची प्रतिमा डागळली आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने शिवसेनेतील वादग्रस्त मंत्र्यांच्या पदावर गंडांतर असल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरच एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा होत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दिल्ली रवाना होण्यापूर्वी उदय सामंत यांच्यासोबत गुप्त चर्चा

दिल्ली दौऱ्यापूर्वी उदय सामंत यांचं विमानतळावर आगमन झालं आणि त्यावेळी शिंदे व सामंत यांच्यात सविस्तर चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी सामंत दिल्लीहून परतले होते, आणि ते पत्रकारांशी बोलणार असतानाच एकनाथ शिंदे तिथे दाखल झाले. यामुळे दोघांमधील बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र या चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.

दिल्लीमध्ये कोणत्या भेटी होणार?

संध्याकाळी ७ वाजता गृहमंत्री अमित शहा यांचं राज्यसभेत भाषण होणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची अमित शहा यांच्याशी प्रत्यक्ष भेट होण्याची शक्यता असून, ही बैठक अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेचे ४ मंत्री सध्या वादाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सत्ताधारी आघाडीतून होत आहे. विशेषतः आमदार भरत गोगावले यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं बोललं जातंय.

राजकीय वर्तुळाचं लक्ष दिल्ली भेटीकडे

शिंदे यांच्या या दौऱ्यामागे मंत्रिमंडळ फेरबदलाची तयारी आहे का? की भाजपकडून शिवसेनेवर दबाव वाढवला जात आहे? हे स्पष्ट होणं बाकी आहे. मात्र त्यांच्या दिल्ली भेटीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना नवी कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्याच्या सत्तेत मंत्रीमंडळ फेरबदलाच्या हालचालींना अधिकृत स्वरूप येणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.