Ajit Pawar Memorial : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने संस्था, ट्रस्ट किंवा स्मारके उभारण्यापूर्वी कुटुंबीयांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
Ajit Pawar Memorial : अजित पवार यांच्या बारामतीजवळील विमान अपघातात झालेल्या निधनानंतर राज्यभरातून त्यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने संस्था, ट्रस्ट, फाउंडेशन नोंदणी किंवा सार्वजनिक ठिकाणी पुतळे व स्मारके उभारण्यापूर्वी कुटुंबीयांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचे उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्यानंतर आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या पदांसाठी 18 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली असून इच्छुकांकडून थेट अर्ज मागवण्यात आले आहेत.
सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अंतिम निर्णयाचा अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. दिवंगत अजित पवार यांना जिल्ह्यातील प्रत्येक गटातील राजकीय परिस्थितीची अचूक माहिती होती. विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांना संधी देण्याची त्यांची पद्धत होती. त्यांच्या निधनानंतर आता कोणत्या कार्यकर्त्याला संधी द्यायची याचा निर्णय सुनेत्रा पवार घेणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
गटनेतेपदी श्रीमंत ढोले यांची निवड
श्रीमंत ढोले (इंदापूर) यांची जिल्हा परिषद गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसने त्याची नोंदणी केली आहे.
अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुक मैदानात
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांनी दावा केला आहे. दौंडमधून वीरधवल जगदाळे, तुषार थोरात, भोरमधून विक्रम कुटवाड, तर बारामतीमधून करण खलाटे यांनी अध्यक्षपदासाठी दावा केला आहे. आंबेगावमधून विवेक वळसे पाटील, मुळशीमधून शांताराम इंगवले यांनीही अध्यक्षपदासाठी मागणी केली आहे.
उपाध्यक्षपदासाठीही दावेदारांची रांग
उपाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ सदस्या सुजाता पवार, मोनिका हरगुडे तसेच इंदापूरमधून अंकिता पाटील यांनीही दावा केला आहे. मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनाही पद मिळावे यासाठी सुनील शेळके आग्रही असल्याची माहिती आहे.
इच्छुक जास्त, कार्यकाळ कमी होण्याची शक्यता
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने यंदा पदांचा कार्यकाळ कमी करण्याचा पर्याय विचारात घेतला जात आहे. आतापर्यंत अडीच वर्षांचा कार्यकाळ देण्याची पद्धत होती. मात्र सर्वांना संधी देण्यासाठी यंदा सव्वा-सव्वा वर्षांचा कार्यकाळ देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


