महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज बिलासंदर्भात मोठी घोषणा केली असून वीजदर लवकरच कमी होणार आहे.
Mumbai : प्रत्येक महिन्याला काहींना भरमसाठ किंमतीतील वीज बिल येते. यामुळे बिल नक्की एवढे का आले यावरुन कधीकधी चिडचिड होते. अशातच महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील घरगुती वीजदर कमी होणार असल्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांच्या कडे ऊर्जामंत्रालयाची जबाबदारीदेखील आहे.
याआधीच्या सरकारच्या काळात, विशेषतः महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कोरोनानंतर वाढलेल्या वीजबिलांमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता हे दर कमी करण्याचा निर्णय झाला आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील वीजदर दरवर्षी टप्प्याटप्प्याने कमी होतील. पहिल्याच वर्षी वीजदरात १० टक्क्यांची कपात होईल आणि पुढील पाच वर्षांत एकूण २६ टक्क्यांची घट होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“वीजग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे! राज्याच्या इतिहासात प्रथमच वीजदरात पहिल्या वर्षी १० टक्के आणि पुढील ५ वर्षांत २६ टक्के इतकी कपात होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) महावितरणच्या याचिकेवर दिलेला हा निर्णय ऐतिहासिक असून आम्ही त्यांचे आभारी आहोत,” असे फडणवीस यांनी ट्विटद्वारे जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटले की, “पूर्वीच्या काळात दरवाढीच्या याचिका सादर होत असत. पण या वेळेस महावितरणने स्वतः वीजदर कमी करण्यासाठी याचिका सादर केली होती, आणि त्यावर एमईआरसीने मंजुरी दिली आहे.”
कोणाला होणार फायदा?
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना थेट फायदा होणार आहे.राज्यातील सुमारे ७०% वीज ग्राहक हे १०० युनिटपेक्षा कमी वापर करणारे आहेत, आणि याच वर्गाला सर्वाधिक म्हणजे १० टक्क्यांचा दर कपात लाभ होणार आहे.
ऊर्जानिर्मितीत हरितऊर्जेचा वापर वाढणार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की,“मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत दिवसा आणि खात्रीशीर वीजपुरवठा बळीराजाला मिळण्यासाठी काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच, आगामी काळात वीज खरेदी करारांमध्ये हरितऊर्जेला प्राधान्य दिल्यामुळे वीजखरेदीचा खर्च कमी होणार आहे. यामुळेच वीजदरात कपात करणे शक्य झाले आहे.”
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.


