सार

महाविकास आघाडीने आतापर्यंत अधिकृतरित्या सातारा लोकसभेच्या जागेवरून उमेदवाराची घोषणा केलेली नाही. अशातच पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस की शरद पवारांचा गट यापैकी कोणाकडून निवडणूक लढवणार याचे त्यांनी उत्तर दिले आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024 : राज्यातील सातारा लोकसभा जागेवरून सध्या चर्चा सुरू आहे. येथील काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) महाविकास आघाडीच्या तिकीटावरून निवडणूक लढवू शकतात असे बोलले जात होते. अशातच पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलेय की, ते काँग्रेसच्या तिकीटावरून निवडणूक लढवण्यास तयार आहेत. याशिवाय शरद पवारांच्या गटाच्या (Sharad Pawar Group) तिकीटावरून निवडणूक लढवणार नाहीत. पक्षाने साताऱ्याच्या जागेवरून तिकीट दिल्यास निवडणूक लढवू असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 

साताऱ्यातील जागेचा तिढा कायम
महाविकास आघाडीने अद्याप अधिकृतरित्या सातारा लोकसभेच्या जागेवरून (Satara Lok Sabha Seat) उमेदवाराची घोषणा केलेली नाही. या जागेवरून शरद पवारांनी श्रीनिवास पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी विचारले होते. पण श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. यामुळे शरद पवारांच्या गटातून साताऱ्याच्या जागेसाठी नव्या उमेदवाराचा शोध घेतला जातोय.

संजय निरुपम यांच्यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी पक्ष सोडल्याच्या निर्णयावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, “याआधीच्या निवडणुकीत काँग्रेसला मुंबईत अधिक जागांवर विजय मिळवता आला नाही. याशिवाय संजय निरुपम सांगत होते ती जागा काँग्रेसला मिळाली नाही. यामुळेच संजय निरुपम नाराज होते आणि विधाने करत होते. ज्यावेळी निरुपम यांनी अधिकच विधाने केली त्यावेळी पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. आता संजय निरुपम यांनी स्वत:साठी पर्याय शोधला असावा. याशिवाय निरुपम यांच्या विधानांमुळे युतीत अडथळे निर्माण होत होते असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.”

सात टप्प्यात होणार निवडणूक
देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जूनला मतदान होणार आहे. मतदानाचे निकाल 4 जूनला जाहीर केले जाणार आहेत.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : शरद पवारांच्या गटातील सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, जाणून घ्या सुप्रिया सुळेंना कोठून दिलेय तिकीट

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय, निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

Lok Sabha Election 2024 : 'आम्ही राज्यात 45 पेक्षा अधिक जागा जिंकणार', उदय सामंत यांचा दावा