सार
सध्याच्या घडीला राजकारणात एकमेकांवर टीका टिप्पणी करणे मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे. यामध्ये कोणत्याही पातळीवर जाऊन सत्ताधारी आणि प्रतिस्पर्धी एकमेकांवर टीका करत आहेत. यामुळे महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण बदलत असल्याचं दिसून येत आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शिंदे सेनेचे सदा सरवणकर हे उभे असून येथील लढत चुरशीची निर्माण झाली आहे. या लढतीवरून राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केले असून ते चर्चेत आले आहेत.
काय म्हणाले राज ठाकरे? -
“१९९५ मध्ये शिवसेनेसाठी माझ्या १७५ सभा झाल्या. अनेकांसाठी सभा झाल्या. त्यातल्या एकासाठी इथे देखील सभा झाली होती. आमच्या ठाकरेंचा संपूर्ण प्रवासाची मूळ भूमी ही दादर-प्रभादेवी-माहीम ही सर्व आहे. जे आजपर्यंत कधी घडलं नाही, ते आज पहिल्यांदा घडतंय की आमच्या तीन पिढ्या या महाराष्ट्रासाठी काम करण्यात गेल्या. याच दादर-माहीम मतदारसंघात आज पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय. अमितसाठी माझी एकच सभा आहे. मी प्रत्येकासाठी सभा देतोय”, असेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
जे कोणाचाच झाला नाही, त्याच्याबद्दल आम्ही काय बोलणार? -
जे कोणाचाच झाला नाही, त्याच्याबद्दल आम्ही काय बोलणार असं म्हणून राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. “त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहे. पण जो कोणाचाच झाला नाही, त्याच्याबद्दल आपण काय बोलायचं? बाळासाहेब ठाकरे हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली. काँग्रेसमधून आमदारकीला उभी राहिली. काँग्रेसमधून आमदारकीला पडली आणि मग पुन्हा शिवसेनेत आली. त्यानंतर पुन्हा निवडणूक लढवली. एकनाथ शिंदेंचं बंड झाल्यानंतर त्यांना शिव्या दिल्या आणि संध्याकाळी त्यांच्यासोबत जाऊन बसले, असं त्यांनी म्हटलं आहे.