परमबीर सिंह यांचे दावे खरे, मला 4 वेळा अटक करण्याचा प्रयत्न झाला : फडणवीस

| Published : Aug 10 2024, 07:53 PM IST

Devendra Fadnavis

सार

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून परमबीर सिंह यांचे दावे खरे असल्याचे म्हटले आहे.

महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विविध प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामागे गृहमंत्री अनिल देशमुख होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांबाबत विचारण्यात आले. यासंदर्भात बोलताना परमबीर सिंह यांनी लावलेले आरोप सत्य असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

परमबीर सिंह यांनी मला आणि भाजपाच्या नेत्यांना अटक करण्यासंदर्भात जो दावा केला आहे. तो खरा आहे. असा प्रयत्न त्यावेळी झाला होता. त्यांनी फक्त एकच घटना सांगितली आहे. मात्र मला अटक करण्याचा प्रयत्न एकदा नाही, तर चार वेळा झाला. खोट्या केस करून मला कशी अटक करता येईल, याचे षडयंत्र झाले, पण त्यावेळी आम्ही त्याचा खुलासा करू शकतो. त्याचे पुरावे आम्ही सीबीआयला दिले, त्याचे पुरावे आजही आमच्याकडे आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनाही अटक करण्याचा प्रयत्न झाला, परमबीर सिंह यांचा दावा

तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाच्या इतर काही नेत्यांना अटक करण्यासाठीसुद्धा अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता, असा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच यासंदर्भात शरद पवार यांच्या सिल्वर ओक आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी बैठक झाली होती, असे ते म्हणाले. त्यांच्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये माझ्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याची सुपारी काही पोलीस अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यांनी ती सुपारी घेतली देखील होती. पण त्यांना यश मिळाले नाही. कारण काही चांगल्या अधिकाऱ्यांनी असे खोटे गुन्हे दाखल करण्यास नकार दिला, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

आणखी वाचा : 

देवेंद्र फडणवीसांची RSS नेत्यांसोबत बैठक : विधानसभा निवडणुकीची ठरली रणनीती?

गचांडीची भाषा?, राज ठाकरे यांचे मनोज जरांगे पाटील यांना खोचक प्रत्युत्तर