सार

मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना 'गचांडी धरणार' असे म्हटले होते. त्यावर राज ठाकरेंनी 'अच्छा… गचांडी? बरं, ते भेटल्यावर मी त्यांना विचारेन' अशी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंच्या आडून शरद पवार, उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : माझं मराठा बांधवांना आवाहन आहे. कोणत्याही नेत्याला अडवू नका. आपलं आंदोलन सुरू नाही. मराठ्यांची ताकद कमी झाली असं म्हणत होता ना? त्यांना जर जाब विचारायचा असेल तर मुंबईत जाऊन त्यांची गचांडी धरून जाब विचारू. एवढी आपली ताकद आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना म्हटले होते. त्यावर राज ठाकरे यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली आहे. अच्छा… गचांडी? बरं, ते भेटल्यावर मी त्यांना विचारेन, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

राज ठाकरे यांचा मराठवाड्याचा दौरा शनिवारी संपत आहे. संभाजीनगरात आल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील वातावरण आणि राजकीय नेत्यांच्या भूमिका यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काही लोकांना राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत. त्यामुळेच समाजात विष कालवले जात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

ती शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची माणसं

मनोज जरांगे तुम्हाला गचांडी पकडून जाब विचारणार आहेत. तसे विधान त्यांनी केले, असे राज ठाकरे यांना विचारण्यात आले. त्यावर राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गचांडी? अच्छा? हे त्यांचे शब्द आहेत की, तुम्ही कोणी भरले? भेटल्यावर मी त्यांना बोलेल. मुळात पहिली गोष्ट लक्षात घ्या. शुक्रवारी जी बीडमध्ये विरोध करणारी माणसं होती. ती जरांगेंची नव्हती. ती कोण माणसे होती हे तुम्ही पाहिले ना? झाले? संपला विषय. त्यांची माणसं नव्हती. ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची माणसं होती. त्यावर मी बोललो आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

मनोज जरांगेंच्या आडून राजकारण सुरू

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आरक्षणाचे काही पडलेले नाही. त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून राजकारण करायचे आहे. 82-83 वर्षाचे शरद पवार महाराष्ट्राचा मणिपूर होईल, अशी स्टेटमेंट करतात. या लोकांनी महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये याची चिंता वाहिली पाहिजे, पण ते महाराष्ट्राचा मणिपूर होईल असे म्हणत आहेत. यावरून यांच्या डोक्यात काय चालू आहे हे लक्षात घ्या, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने केलं स्टेप बाय स्टेप जातीय तेढ निर्माण करणारे राजकारण

शरद पवार यांचं राजकारण तुम्ही पाहा. जेम्स लेनप्रकरणापासून त्यांनी स्टेप बाय स्टेप जातीय तेढ निर्माण करणारे राजकारण केले. सर्वांनाच जातीबद्दल प्रेम असते. वर्षानुवर्षापासून आहे. पण फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील प्रत्येक व्यक्तीचे जातीबद्दल प्रेम आहे. पण दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष पसरवण्याचे काम राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सुरू झाले, असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

आणखी वाचा : 

देवेंद्र फडणवीसांची RSS नेत्यांसोबत बैठक : विधानसभा निवडणुकीची ठरली रणनीती?