Padalkar Awhad Clash : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यावर विधानभवन परिसरात हल्ला झाला. आव्हाडांनी या हल्ल्यामागे 'मकोका' कायद्यांतर्गत नोंदणीकृत खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यांतील आरोपींचा हात असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानभवन परिसरात झालेल्या मारहाणीबद्दल एक धक्कादायक आरोप करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यांचे पदाधिकारी नितीन देशमुख यांना झालेल्या मारहाणीमागे 'मकोका' (Maharashtra Control of Organized Crime Act) कायद्यांतर्गत नोंदणीकृत खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यांतील आरोपींचा हात असल्याचा आव्हाडांचा दावा आहे. हे आरोपी आपल्यालाच मारण्यासाठी विधानभवनात आले होते, मात्र आपण तिथे नसल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला लक्ष्य केले, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
नितीन देशमुख यांना मारहाण झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तात्काळ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली.
आव्हाडांचे गंभीर आरोप, 'मलाच मारण्याचा कट'
आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना सांगितले की, "आज विधानसभेत माझे भाषण सुमारे सव्वा तास चालले. त्यानंतर मी बाहेर पडलो, पण काही मिनिटांतच नितीनला मारहाण झाल्याचा फोन आला. तातडीने मी विधिमंडळात परत आलो आणि मारहाणीची चित्रफित पाहिली. ज्यांनी मारहाण केली ते साधे कार्यकर्ते नव्हते. ते मकोकातले खून आणि दरोड्याचे आरोपी होते."
आव्हाडांनी पुढे म्हटले, "गेले काही दिवस त्यांची माझ्यावर नजर होती. मलाच मारण्याचे त्यांचे नियोजन होते. प्रश्न हा आहे की, मकोकाचे आरोपी अशा पद्धतीने विधानभवनात कसे येतात? सभागृहाची काही परंपरा आहे की नाही? ही लोकशाहीचे मंदिर आहे आणि इथेच असे प्रकार घडत असतील तर राज्याची कायदा-सुव्यवस्था कशी असेल?" या घटनेमुळे आपल्याला मानसिक त्रास झाल्याचेही त्यांनी नमूद केले. "सहा वेळेस निवडून आलेल्या आमदाराला मारायला अशा पद्धतीचे लोक विधानभवनात आणले जातात, हे गंभीर आहे," असे आव्हाड यांनी म्हटले.
'नितीनच्या जागी मी असतो', आव्हाडांना कार्यकर्त्याची काळजी
"तो माणूस आत येतो, माझ्याकडे रागाने बघतो. गेल्या दोन-तीन दिवसांपासून डोळे वटारून माझ्याकडे पाहिले जात आहे," असे सांगत आव्हाडांनी यामागे पूर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला. "आज झालेली घटना मुख्यमंत्री फडणवीस गांभीर्याने घेतील अशी अपेक्षा आहे. सव्वा तास भाषण करून मी निघून गेलो. जर मी नेहमीप्रमाणे चालत असतो, तर नितीनच्या जागी मी असतो. माझ्यासाठी माझ्या कार्यकर्त्याने मार खाल्ला, मला त्याचे फार वाईट वाटते आहे," अशी खंत आव्हाड यांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे राजकीय संस्कृती कुठे चालली आहे, असा सवालही आव्हाडांनी उपस्थित केला आहे. सभागृहाच्या पटलावर हा सगळा प्रकार मांडल्याचे त्यांनी सांगितले. विधिमंडळाच्या परिसरातच असा गंभीर प्रकार घडल्याने, या प्रकरणाचे पडसाद आगामी काळात राज्याच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता आहे.


