- Home
- Maharashtra
- Government Jobs: राज्यात मेगाभरतीचा मार्ग मोकळा! १० हजार अनुकंपा भरतीला मंजुरी, मात्र स्पर्धा परीक्षा समितीने व्यक्त केला विरोध
Government Jobs: राज्यात मेगाभरतीचा मार्ग मोकळा! १० हजार अनुकंपा भरतीला मंजुरी, मात्र स्पर्धा परीक्षा समितीने व्यक्त केला विरोध
Maharashtra State Government Jobs: महाराष्ट्र सरकारने राज्यभरात 10 हजार पदांवर अनुकंपा तत्वावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती चतुर्थ श्रेणीतील विविध रिक्त पदांसाठी असून, 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल.

मुंबई: सरकारी नोकरीच्या संधी शोधणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यभरात तब्बल 10 हजार पदांवर अनुकंपा तत्वावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती लवकरच सुरू होणार असून, यात चतुर्थ श्रेणीतील विविध रिक्त पदांचा समावेश असेल.
राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदं
राज्यात अनेक वर्षांपासून सरकारी नोकरभरती प्रक्रियेचा अभाव होता. त्यामुळे अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरले जात होते. मात्र, सरकारने आता खासगी कंत्राटी नोकरभरती थांबवून थेट पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरभरती देण्याचा निर्णय घेतला आहे.
अनुकंपा तत्व म्हणजे काय?
शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्याला सरकारी नोकरी देण्याची ही एक पद्धत आहे. यातून त्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य व सामाजिक सुरक्षितता मिळते. याच तत्वावर आधारित भरतीचा निर्णय आता सरकारने घेतला आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सरकारला सवाल
या निर्णयावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. “आम्ही वर्षानुवर्षे अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देतो, मग आमच्या जागा कोणाला फुकट द्यायच्या?” असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी सरकारकडे पारदर्शक आणि समान संधी मिळवून देणाऱ्या पर्यायी व्यवस्थेची मागणी केली आहे.
भविष्यातील नियोजन व सुधारणा
राज्य शासनाने अनुकंपा तत्वावरील या भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जापासून नियुक्तीपर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी नवे मार्गदर्शक तत्त्व तयार करण्यात आले आहेत. ही भरती प्रक्रिया १५ सप्टेंबर २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयांच्या देखरेखीखाली राबवली जाणार आहे.

