Ladki Bahin Yojana : गोंदिया जिल्ह्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत २६,९२७ महिलांनी लाभ सोडला आहे. बोगस लाभार्थी आणि नवीन नोंदणी बंद असल्याने अनेक पात्र महिला लाभापासून वंचित आहेत. 

गोंदिया : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला; पण आता ही योजना राजकीय आरोपांमुळे आणि बोगस लाभार्थींच्या मुद्द्यावरून अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यात तब्बल २६,९२७ महिलांनी या योजनेचा लाभ सोडला आहे, तर योजनेची नवीन नोंदणीही गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असल्याने अनेक पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्या आहेत.

बोगस लाभार्थींवर टाच आणि योजनेचे बदलते स्वरूप

महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ देण्याच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत काही बोगस लाभार्थ्यांनी घुसखोरी करून पैसे लाटल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर शासनाने अशा महिलांचा शोध सुरू केला, ज्याचा परिणाम म्हणून गोंदिया जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिलांनी या योजनेतून माघार घेतल्याचे दिसते.

आधार लिंकवरून पडताळणी

'लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणे अनिवार्य आहे. याच माध्यमातून आता 'नमो शेतकरी सन्मान योजने'त सहभागी महिलांचीही पडताळणी केली जात आहे.

'लाडकी बहीण' योजनेतून कोण बाद होणार?

शासनाने आता लाभासाठी कडक नियम लागू केले आहेत, ज्यामुळे अनेक अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.

उत्पन्नाची मर्यादा: कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास किंवा कुटुंबात आयकर भरणारा सदस्य असल्यास.

सरकारी नोकरदार: कुटुंबातील सदस्य नियमित, कायमस्वरूपी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असल्यास.

इतर योजनांचे लाभार्थी: इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या १,५०० रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळल्यास.

राजकीय पदधारक: कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या विविध उपक्रमांमध्ये संचालक अथवा सदस्य असल्यास.

मालमत्ताधारक:

कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असल्यास.

कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) असल्यास.

या अटींमुळे आता आयकर भरणाऱ्या किंवा ज्यांच्या कुटुंबात कार आहे, अशा अनेक महिलांची नावे योजनेतून वगळली जाणार असल्याने लाभार्थींची संख्या लक्षणीयरीत्या घटण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सध्या ३ लाख ३७ हजार ५०७ महिला घेत आहेत या योजनेचा लाभ

गोंदिया जिल्ह्यात सध्या ३ लाख ३७ हजार ५०७ महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांना मार्च महिन्याचा हप्ता 'डीबीटी'द्वारे बँक खात्यात जमा झाला आहे; परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. आगामी काळात नवीन नियमांमुळे लाभार्थींची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महिला व बालविकास अधिकारी, गोंदिया येथील कीर्तीकुमार कटरे यांनी स्पष्ट केले आहे की, "ज्यावेळी योजनेचे अर्ज दाखल झाले, त्याच वेळी इतर योजनांमधून पैसे मिळत असतील तर 'लाडकी बहीण' योजनेतून ते वजा केले जातील, अशी सूचना होती. त्यामुळे त्यासंदर्भात इतर आदेशाची गरज नाही. अशा महिलांनी अनुदान नाकारले आहे. याशिवाय आता नवीन महिलांची नोंदणी बंद करण्यात आली आहे." या परिस्थितीमुळे योजनेच्या भवितव्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत, तसेच अनेक पात्र महिला वंचित राहिल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर आहे.